सिद्दिकीसह अमित नाईक, हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली यांची नावे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जमीन व्यवहार प्रकरणात अटक केलेला मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झाला होता. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी सिद्दिकी याच्यासह बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक आणि हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली यांच्याविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
जमीन व्यवहार प्रकरणातील संशयित सिद्दिकी खान चार वर्षांपासून फरार होता. गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीमधून अटक केली होती. सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने तत्कालीन आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याची मदत घेतली होती. गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम (केरळ) पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती.
खळबळ उडवून देणारा सिद्दिकीचा व्हिडिओ
दरम्यान, फरार असताना सिद्दिकीने व्हिडिओ जारी केला होता. त्यात तो म्हणतो, ‘पोलिसांनीच मला हुबळी येथे आणले आणि एनकाऊंटर करण्याची धमकी देऊन सोडून दिले. मला सोडण्यात दहा ते बारा पोलिसांचा सहभाग आहे. मी गोव्यात परत यायला तयार आहे; पण सीबीआयमार्फत प्रकरणाचा तपास झाला पाहिजे.’ या व्हिडिओत त्याने पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केले होते. सिद्दिकीचा हा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह अॅड. अमित पालेकर यांना पाठवण्यात आला होता. पालेकर बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून सुनील कवठणकर यांनी तो व्हिडिओ जारी केला होता.
दुसऱ्या व्हिडिओबाबत मात्र सिद्दिकीचे ‘कानावर हात’
सिद्दिकी पलायन प्रकरणात जुने गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. याच दरम्यान सिद्दिकीचा खळबळ उडवून देणारा दुसरा व्हिडिओ आला होता. मात्र हल्लीच सिद्दिकीने ‘पोलिसांनी दबाव टाकून दुसरा व्हिडिओ काढण्यास भाग पाडले होते’, असे सांगितले होते.
जुने गोवा पोलिसांनी सिद्दिकी पलायन प्रकरणी तपास पूर्ण करून सिद्दिकीसह बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक आणि हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली यांच्याविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी २५ रोजी होणार आहे.