चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने दुबईत रविवारपासून कसून सराव करण्यास सुरुवात केली. तसे पाहिल्यास कागदावर भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत बलाढ्य दिसत असला तरी भारतीय संघासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे ती, वेगवाग गोलंदाजांची!
भारतीय संघाने मायभूमीत इंग्लंडला ३-० ने धूळ चारली. त्यामुळे संघाचे मनोबल उंचावलेले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने फलंदाजी आणखीनच मजबूत झाली आहे. फलंदाजांच्या ताफ्यात आपल्या एकापेक्षा एक नावे दिसून येतील. पण वेगवान गोलंदाजांच्या रकान्याकडे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच टेन्शन येईल. कारण या रकान्यामध्ये भारताचा हुकमी एक्का आणि मॅचविनर गोलंदाज जसप्रित बुमराहचे नाव नाही. बुमराहने या वर्षी अप्रतिम कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने या वर्षीचा आयसीसी प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कारही पटकावला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहचे नाव संघात नसणे, ही बाब भारतीय संघाला मोक्याच्या क्षणी अतिशय घातक ठरू शकते.
बुमराहनंतर नाव येते ते, मोहम्मद शमीचे. विश्वचषक स्पर्धा खऱ्या अर्थाने शमीमुळे भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरली. अंतिम सामना वगळता पूर्ण स्पर्धेत शमीने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. दुखापतग्रस्त असूनही त्याने गोलंदाजीने स्पर्धेत कहर केला. सध्या तो दुखापतीनंतर संघात परतला आहे. मात्र त्याला पहिल्यासारखी लय पकडण्यासाठी काही काळ मैदानात घालवावा लागेल. इंग्लंडसोबतच्या मालिकेत त्याने काही सामन्यांत गोलंदाजी केली. पण त्याच्या गोलंदाजीत पहिल्यासारखी धार दिसून आली नाही.
सध्या भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी पाकिस्तान आणि तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड आहे, आणि हे दोन संघ भारतीय संघाला मोठी डोकेदुखी ठरू शकतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासारख्या संघांना आधीच दुखापतीचे ग्रहण लागले आहे. पाकिस्तान संघ दुबईत मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्यांना तेथील मैदानांची पूर्ण ओळख आहे आणि न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरात धूळ चारल्यामुळे त्यांचेही मनोबल भारताएवढेच उंचावलेले आहे. त्यामुळे या दोन संघांकडून भारतीय संघाला सतर्क रहावे लागणार आहेच, त्याच बरोबर इतरांनाही कमी लेखून चालणार नाही. कारण, श्रीलंंकेने नुकतेच बलाढ्य आस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देऊन सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी सोपी जाणार नाही, एवढे निश्चित!
- प्रवीण साठे, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत