गतवर्षी तब्बल ९७.५१ टक्के अपघात निष्काळजीपणामुळे

पोलिसांचा अपघात विश्लेषण अहवाल : साळगाव पोलीस हद्दीत अपघातात ४६.६७ टक्के वाढ

Story: प्रसाद शेट काणकोणकर |
16th February, 11:56 pm
गतवर्षी तब्बल ९७.५१ टक्के अपघात निष्काळजीपणामुळे

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०२४ मध्ये २,६८२ अपघातात २८६ जणांचा मृत्यू झाला होता. वरील कालावधीत ९७.५१ टक्के अपघात चालकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरीने वाहन चालवल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ मध्ये सर्वाधिक २२२ अपघात वेर्णा, तर सर्वाधिक २२ मृत्यू डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले. साळगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत ४६.६७ टक्क्यांनी अपघातात वाढ झाली आहे. हा परिसर संवेदनशील असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या वार्षिक अपघात विश्लेषण अहवालातून स्पष्ट झाले आहे.
गोवा पोलिसांनी रस्त्यांवरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यांना आळा घालण्यासाठी वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटिनल) योजना सुरू केली होती. नागरिकांनी विरोध केल्यामुळे ती योजना बंद करण्यात आली होती. ही योजना आता नव्या स्वरूपात सुरू करण्याचा पोलीस खात्याने विचार सुरू केला असल्याची माहिती आहे. याशिवाय पोलिसांनी वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी विविध उपक्रम, मोहिमा राबवल्या, तरीही अपघात होतच आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष मोहिमा राबवून कारवाई केली जात आहे.
वाहतूक पोलीस विभागाच्या २०२४ मधील वार्षिक विश्लेषण अपघात अहवालानुसार, राज्यात सर्वाधिक २२२ अपघात वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले. त्यानंतर २१३ अपघात पणजी, १८८ पर्वरी, १७९ जुने गोवा, १६९ मायणा - कुडतरी, तर इतर पोलीस स्थानकांच्या हद्दीत मिळून राज्यात २,६८२ अपघात झाले. सर्वाधिक २२ अपघाती मृत्यू डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले. त्यानंतरफोंडा पोलीस स्थानकाच्या परिसरात २० मृत्यू, आगशी १९, जुने गोवा आणि वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी १८, तर इतर पोलीस स्थानकांच्या हद्दीत मिळून २८६ मृत्यू झाले.
१,१०४ अपघात कारचे, तर १,०९३ अपघात दुचाकींचे
राज्यात २,६८२ पैकी सर्वाधिक ४१.१५ टक्के (१,१०४) अपघात कारचे, ४०.७४ टक्के (१,०९३) अपघात दुचाकींचे झाले. या व्यतिरिक्त १८.११ टक्के (४८५) अपघातात इतर वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक २८८ कार अपघात पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले. त्यानंतर १८४ पर्वरी, १६५ वेर्णा, १२६ जुने गोवा, १०३ आगशी, तर इतर पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळून १,१०४ कार अपघात झाले आहेत. सर्वाधिक १२९ दुचाकी अपघात वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले आहेत. त्यानंतर १२४ मायणा - कुडतरी, १२२ पणजी, ११७ जुने गोवा, ८३ डिचोली तर इतर पोलीस स्थानकांच्या हद्दीत मिळून १,०९३ दुचाकींचे अपघात झाले आहेत.
साळगावात २०२४ मध्ये झाले २२ अपघात
साळगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत २०२३ मध्ये १५ अपघात झाले होते, तर २०२४ मध्ये २२ अपघात झाले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ७ अपघात वाढले. त्यामुळे ४६.६७ टक्के अपघातात वाढ झाल्याचे वाहतूक पोलीस विभागाच्या वार्षिक अपघात अहवालातून स्पष्ट झाले आहे.