स्मार्ट सिटी; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेवरून प्रश्नचिन्ह

कामे सुरू असलेल्या भागांत अधिकाधिक वाहतूक पोलिस आणि कामांमुळे वळवण्यात आलेल्या मार्गांवर वाहतुकीच्या कोंडीत वाहतूक पोलिसांची कमतरता यामुळे या मार्गांवरून प्रवास करणारे वाहन चालक राजरोसपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे इथल्या देश-विदेशातील पर्यटकांसह सूज्ञ स्थानिकांच्या मनातली पोलिसांबाबतची प्रतिमा शब्दांत सांगणे कठीण.

Story: कॉलिंग अटेंशन |
16th February, 12:18 am
स्मार्ट सिटी; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेवरून प्रश्नचिन्ह

स्मार्ट सिटीअंतर्गत राजधानी पणजीत गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून विविध कामे सुरू आहेत. मध्यंतरी पावसाळ्याच्या काळात ही कामे बंद ठेवण्यात आली. पावसाळा संपताच पुन्हा कामे सुरू करण्यात आली. पण, ही कामे सुरू झाल्यापासून वाहतूक पोलिसांनी पणजीतील विविध भागांत घेतलेली दक्षता, केलेला कडेकोट बंदोबस्त आणि खड्ड्यांतून मार्ग काढत जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्यांकडून जराही वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ देण्यात येत असलेली चलने बघून स्थानिकांसह वाहन चालकांकडूनही​ अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

राजधानी पणजी स्मार्ट सिटी बनावी, स्थानिकांसह दरवर्षी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना पणजीत आवश्यक त्या सोयीसुविधा मिळाव्या, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु, स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा स्थानिक जनता आणि राज्यभरातून पणजीत येत असलेल्या वाहन चालकांना फटका बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असेच सर्वांना वाटत होते. पण, जेव्हापासून ही कामे सुरू झालेली आहेत, तेव्हापासून आतापर्यंत स्थानिक आणि वाहन चालकांसमोर केवळ संकटेच उभी राहत आहेत. स्मार्ट सिटीची कामे संपण्यासंदर्भात ‘इमॅजिन पणजी​’ने आतापर्यंत अनेक तारखा दिल्या. परंतु, त्यांनी दिलेल्या मुदतीत कामे संपलेली नाहीत. गेली दोन वर्षांतील अनुभव घेऊन यंदातरी स्मार्ट सिटीच्या कामांच्या काळात स्थानिकांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासन घेईल असे वाटत होते. परंतु, यंदाही त्यांचे ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरूच आहे.

गतवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर कामे पूर्ण न झालेल्या रस्त्यांवरील खड्डे कंत्राटदारांनी कसेबसे बुजवले. त्याचा फटका पावसाळ्यात वाहन चालकांना कसा बसला, याचे चित्र संपूर्ण गोव्याने अनुभवले. पावसाळा संपताच पुन्हा त्याच रस्त्यांची खुदाई सुरू केली. गेल्या तीन महिन्यांच्या काळात पणजीतील विविध भागांतील मुख्य आणि अंतर्गत रस्ते मलनिस्सारण तसेच इतर कामांसाठी खोदण्यात आलेले आहेत. त्यासाठी वाहतूक वळवण्यात आलेली आहे. पण, वळवण्यात आलेल्या वाहतुकीची माहिती देणारे फलक आवश्यक त्या-त्या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पर्यटक आणि पणजीची माहिती नसलेल्या गोव्यातील विविध भागांतील नागरिकांना आवश्यक त्या ठिकाणी जाण्यासाठी दमछाक होत आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये एकाबाजूला भोंगळ कारभार सुरू असताना, वाहतूक पोलीस मात्र पणजीत कमालीचे सतर्क झालेले आहेत. एव्हाना, पणजीत अनेक भागांत वाहतूक कोंडी होते. त्यावेळी तेथे केवळ एकच वाहतूक पोलीस दिसतो. पण, आता मात्र ज्या-ज्या भागांमध्ये कामे सुरू आहेत, तेथे पाच-पाच वाहतूक पोलीस दिवसभर गस्त घालताना दिसत आहेत. वाहन चालक मार्ग चुकले किंवा त्यांच्याकडून थोडी जरी चूक झाली, तरी त्यांना अडवून चलन देताना ते ज्या प्रकारे कर्तव्यदक्षता दाखवत आहेत, ते पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सध्या पणजी बसस्थानकापासून भाटलेत येणारा रस्ता कामांमुळे केवळ दुचाकीस्वारांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतुकीवर पाळत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंना पाच-पाच वाहतूक पोलीस ठेवण्यात आलेले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी डोळ्यांत तेल घालून हे पोलीस सेवा बजावत आहेत. पण, आपल्या मर्जीतील कार चालकांना बिनधास्तपणे वाट मोकळी करून देऊन पोलिसच या मार्गावरील वाहतूक कोंडीचे कारण बनत आहेत. या मार्गावर दोन्ही बाजूंना पहारा देत असलेल्या वाहतूक पोलिसांत काडीचाही समन्वय नाही. त्यांचे लक्ष केवळ चलने देण्यावरच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे त्या भागातील स्थानिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरत चालली आहे.येत्या ३१ मार्चपर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्णत्वास येतील, अशी हमी ‘इमॅजिन पणजी’च्या व्यवस्थापनाने दिली आहे. त्यात किती यश मिळते, हे ३१ मार्चनंतरच दिसून येईल. पण, तोपर्यंत जीव ओतून सेवा बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकांना मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यांवरून वाहने हाकताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल.

जिथे कामे सुरू आहेत, त्याच भागांत अधिकाधिक वाहतूक पोलिसांची वर्णी लावण्यात आलेली आहे. परंतु, या कामांमुळे वाहतूक वळवण्यात आलेल्या मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असतानाही तेथे मात्र वाहतूक पोलिसांची कमतरता भासत आहे. ही स्थिती माहिती असल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणारे वाहन चालक राजरोसपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पणजीतील ही स्थिती पाहून पणजीत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसह सूज्ञ स्थानिकांच्या मनात पोलिसांबाबत काय प्रतिमा तयार झाली असेल, हे शब्दांत सांगणे कठीण.

 
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)