प्रदूषणामुळे कुंकळ्ळीत २८ जणांना श्वसनाचा त्रास

बाळ्ळी आरोग्य केंद्राचा अहवाल : २९ जणांना त्वचेची अॅलर्जी, ११ जणांना दम्याचा त्रास


13th February, 12:35 am
प्रदूषणामुळे कुंकळ्ळीत २८ जणांना श्वसनाचा त्रास

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कुंकळ्ळी आयडीसी परिसरात २८ जणांना श्वसनाचा त्रास, २९ जणांना त्वचेची अॅलर्जी, ११ जणांना दम्याचा त्रास जाणवत आहे. या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र बाळ्ळीकडून अहवाल अाल्यानंतर कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून पालिका क्षेत्रात व्यापक आरोग्य प्रभाव मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे.
कुंकळ्ळी मतदारसंघातील जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या पर्यावरण आणि आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आलेमाव यांनी केली आहे. बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीलगतच्या परिसरातील सुमारे ४४९ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्यात औद्योगिक प्रदूषणामुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे, हे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणात लोकांनी परिसरात प्रदूषण, दुर्गंधी असल्याच्या तक्रारी केल्या असून त्यांना अॅलर्जी असल्याची तक्रार केली आहे. नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आरोग्यमंत्र्यांनी कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
पालिका क्षेत्रात सर्वेक्षणाची मागणी
बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार, त्यांनी शिंपल्यार, केगडीकोटो, मास्कोणी, बेलाथेंब, गुळ्यांकोटो, भाटी, ताकाबांद आणि आयडीसी परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले आहे. आता पालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्याची मागणी आलेमाव यांनी केली आहे.
विविध आजार बळावल्याचे स्पष्ट
अहवालानुसार सुमारे २८ जणांना श्वसनाचा त्रास, २९ जणांना त्वचेची अॅलर्जी, ११ जणांना अस्थमा, एकाला क्रोनिक किडनीचा आजार, ८ जणांना सायनसचा त्रास, दोघांना क्षयरोगाचा पूर्वीचा इतिहास, एकाला सोरायसिस, तर काहींनी धुळीची अॅलर्जी आणि डोळ्यांना जळजळ झाल्याची तक्रार केली आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिजही आढळला आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत टाकण्यात येणाऱ्या धोकादायक कचऱ्याबरोबरच कुंकळ्ळीमधील पाणी आणि वायू प्रदूषणाची वाढलेली पातळी, विशेषत: मत्स्य प्रक्रिया युनिट्स, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील पोलाद निर्मिती युनिट्समुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजण्यासाठी सरकारने त्वरित आणि सखोल चौकशी करावी.
_ युरी आलेमांव, विरोधी पक्ष नेते

हेही वाचा