पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींत १०० कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा तयार होणार आहेत. आयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयडीसी मंडळाची बैठक उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयडीसीचे अध्यक्ष अालेक्स रेजिनाल्ड आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसह नवीन रस्ते तयार केले जातील. कचरा संकलनासाठी तसेच कचरा साठवण्यासाठी जागा निश्चित केल्या जातील. औद्योगिक वसाहतींमध्ये कचरा संकलन किंवा कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा नाही. यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. तसेच पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा निर्माण केल्या जातील.
रासायनिक किंवा दूषित पाणी प्रकल्प (ईटीपी) विकसित केले जातील. ईटीपी नसल्यामुळेअभावी कचरा आणि रासायनिक पाण्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दूर होईल, अशी माहिती रेजिनाल्ड यांनी दिली.
औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक भूखंड पडीक आहेत. काही भूखंड उद्योजकांनी घेतले आहेत. मात्र, त्याचा वापर केलेला नाही. हे भूखंड वापरात आणले जातील. सदर प्रक्रिया गोवा चेंबर आणि गोवा लघु उद्योग संघटना यांना विश्वासात घेऊन केली जाईल. - आलेक्स रेजिनाल्ड, अध्यक्ष, आयडीसी