इंटर मीडिया फुटसाल स्पर्धा २०२५ : स्पोर्ट्स बाल्काओ विजेता
पणजी : गोवा क्रीडा पत्रकार संघटना आयोजित पहिल्या इंटर मीडिया फुटसाल स्पर्धा २०२५मध्ये प्रुडंट मीडियाला उपविजेतेपद प्राप्त झाले. स्पर्धेतील विजेतेपद ‘स्पोर्ट्स बालकाओ’ने पटकावले.
अंतिम सामन्यात स्पोर्ट्स बाल्काओने प्रुडंट मीडियावर ३-० असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत प्रुडंट मीडियाने प्राइम मीडियाला हरवून आपले स्थान अंतिम फेरीत पक्के केले तर स्पोर्ट्स बाल्काओने ऑल इंडिया रेडिओवर मात केली.
प्रुडंटचा क्लाईव्ह ठरला सर्वोत्कृष्ट गोलकीपर
प्रुडंट मीडियाचा क्लाईव्ह आल्वारेस याला सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून गौरवण्यात आले, स्पोर्ट्स बाल्काओचा ड्रेक डायस याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आणि स्पोर्ट्स बाल्काओचाच वोरेल डिसोझा याला अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार मिळाला. नवहिंद टाईम्सचे किशोर कामत याला सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
बक्षीस वितरण समारंभात सांताक्रूझचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अर्कांजो आरावजो आणि सॅव्हियो कॉर्डो नानी यांच्यासह विजेत्या संघाला पुरस्कार प्रदान केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय गोवा क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश गावकर, सचिव धीरज महांबरे आणि सदस्य अनिरुद्ध राऊळ आणि संतोष कुबल यांच्या प्रयत्नांना मिळाले. सहभागी संघांमध्ये प्राइम मीडिया, गोवा ३६५, प्रुडंट मीडिया, स्पोर्ट्स बालकाओ, नवहिंद टाईम्स, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, भांगरभुई, टाइम्स ऑफ इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा समावेश होता.