धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर केले ७३ वेळा वार. या हल्ल्यामध्ये हल्लेखोराने आपल्या आईला देखील गंभीररीत्या जखमी केले आहे.
हैदराबाद : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून २८ वर्षीय कीर्ती तेजाने त्यांचे ८६ वर्षीय आजोबा व्हीसी जनार्दन राव यांची निर्घृण हत्या केली. तेजाने त्याच्या आजोबांवर ७३ वेळा चाकूने वार केले. यात त्याची आई देखील गंभीर जखमी झाली आहे. जनार्दन राव हे ४६० कोटी रुपयांचे मार्केट व्हेल्युएशन असलेल्या वेलजन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि एमडी होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.
व्हीसी जनार्दन राव यांनी अलिकडेच त्यांच्या मोठ्या मुलीचा मुलगा श्री कृष्णा याला वेलजन ग्रुपचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. तर त्यांची दुसरी मुलगी सरोजिनी हिचा मुलगा कीर्ती तेजा याच्याकडे ४ कोटी रुपयांचे शेअर्स हस्तांतरित केले होते. या निर्णयामुळे तेजा नाराज झाला आणि तो त्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी आजोबांच्या घरी गेला. संभाषणादरम्यान वाद वाढत गेला आणि तेजाने रागाच्या भरात आजोबांवर चाकूने हल्ला केला.
प्राप्त माहितीनुसार, तेजा गुरुवारी रात्री त्याची आई सरोजिनी देवीसोबत आजोबांच्या घरी गेला होता. जेव्हा त्याची आई चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा तेजाने कंपनीतील संचालक पदावरून आजोबांसोबत वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान त्याचा राग वाढला आणि त्याने चाकू काढून आजोबांवर हल्ला केला. रागाच्या भरात त्याने आजोबांवर ७३ वेळा वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की जनार्दन राव यांचा जागीच मृत्यू झाला. तेजाची आई सरोजिनी देवी मध्यस्थी करण्यासाठी आली तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला. सरोजिनी देवी यांच्या शरीरावर चार गंभीर जखमा झाल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, पण त्या अजूनही शॉकमध्ये आहेत. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.
हत्येनंतर तेजाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला धमकावले आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की तपास सुरू आहे आणि आरोपीची चौकशी केली जात आहे.
काही अहवालांनुसार, हत्येच्या वेळी तेजा दारूच्या नशेत होता. तो ड्रग्जच्या प्रभावाखाली होता का, या दृष्टिकोनातूनही पोलिस तपास करत आहेत. पोलीस आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करत आहेत आणि अहवाल आल्यानंतर या प्रकरणात नवीन खुलासे होऊ शकतात. व्ही.सी. जनार्दन राव हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते तर एक समाजसेवक देखील होते. त्यांनी एलुरू येथील सरकारी जनरल हॉस्पिटल आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला आहे. त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रातील लोकांना धक्का बसला आहे.