मृगजळ प्रत्यक्ष दिसत असले तरी तो केवळ भासच. पाण्याच्या दिसण्यात हवा दिसते का? किरण दिसतात का? नाही. हे दोन्ही त्या मृगजळ-भासाचे आधार असतात. त्या सगळ्यांसकट सूर्य अखंडच असतो. त्याच प्रकारे माझ्या आश्रयाने सगळे दृश्य जगत् साकारते.
मा गील लेखात आपण ९ व्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकावरील विस्तृत विवेचन पाहिले. आता चौथ्या श्लोकाकडे वळुया.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित:।।४।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, मज सच्चिदानंदघन परमात्म्याकडून हे सर्व जगत् जसे बर्फामध्ये पाणी असते तसे परिपूर्ण आहे आणि सर्व भूते माझ्या ठिकाणी संकल्पाच्या आधाराने स्थित आहेत (म्हणून वास्तविक) मी त्यांच्यामध्ये स्थित नाही.
विस्तृत विवेचन : जसे दही हे दुधापासून होते, तसे हा सर्व विश्वांचा विस्तार माझ्यापासून होतो. जसे बीजापासून वृक्ष आकारतो व सोन्यापासून दागिने आकारतात तशाच प्रकारे हे धनंजया, हे चराचर विश्व माझ्यापासूनच आकारते हे समजून घे. अव्यक्तपणे जे थिजून राहिले होते, तेच त्रैलोक्याच्या रूपाने विश्वाकार झाले आणि अशा रीतीने अमूर्त असलेला असा मी इथे आकारास आलो आणि हे पार्था, संख्याशास्त्रामध्ये वर्णिलेल्या पंचवीस मूलतत्वांपैकी पहिले जे महतत्व, त्याच्यापासून स-आदि-अन्त देहापर्यंत जे जे म्हणून काही अस्तित्व भासते ते सगळे पाण्याच्या भासणाऱ्या फेसाप्रमाणे माझ्या ठायीच आहे असे समज. पण जसे त्या फेसाकडे पाहिले तर पाणी दिसत नाही, किंवा जसा स्वप्नातील अनेकत्वाचा आभास जागृतीत प्रत्ययास येत नाही, तसे हे समस्त विश्व जरी माझ्या ठायी असले तरी मी त्यात नाही. हीच उत्पत्ती अर्जुना, मी तुला यापूर्वी विस्ताराने सांगितली आहे. त्याची पुनरावृत्ती आता नको. पण माझे जे खरे स्वरूप आहे तिथेच तुझी दृष्टी स्थिर राहू दे.
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः।।५।।
सरळ अर्थ : ती सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित नाहीत. माझी योगमाया व माझा प्रभाव तर 'पहा' की भूतांचे धारण व पोषण करणारा व भूतांना उत्पन्न करणाराही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी स्थित नाही.
विस्तृत विवेचन : जाणीव बाजूस सारून पहायला गेले तर माझे रूप मायेच्याही बरेच पलिकडे आहे. त्या दृष्टीने माझ्यामध्ये हे सगळे विश्व आहे असे म्हणणेही व्यर्थ होय!
एरवी जाणीव-रुपी संधिकालात बुद्धीच्याही डोळ्यांवर झापड येते आणि त्यायोगे मी अखंडित असूनही खंडित झालेला व भिन्न भासतो. मनात शंका असते तोपर्यंत माळ सापासारखी दिसते. शंका दूर झाली की ती पूर्ववत माळ दिसायला लागते! तसे जाणिवेची सांज लोपली की माझे अखंड स्वरूप बुद्धीला दिग्गोचर होते.
एरवी जमिनीतूनच आपोआप मडक्यांचे कोंब निघून त्याचीच पुढे मोठी मडकी झालीत, असे कधी होते का? नाही. मडक्यांची निर्मिती सर्वार्थाने कुंभाराच्या बुद्धीतून आणि कृतीतूनच होते किंवा समुद्राच्या आत काय काही लाटांच्या खाणी आहेत का? नाहीतच. पण वाऱ्याच्या संसर्गाने सागरपृष्ठी लाटा उठतात की नाही?
कापसाच्या पोटात काय कापडाच्या पेट्या असतात का? नाही. कातकर-विणकरांच्या बुद्धी-कृतीतूनच त्या कापसामधून वस्त्रे तयार होतात की नाही? एऱ्हवी सोन्याचे कितीही रूपांतर जरी दागिन्यांमध्ये केले तरी त्याचा सुवर्णपणा कधी मोडतो काय? नाही. पण ते दागिने परिधान करणाऱ्याला आपण दागिने परिधान केल्याचाच भास होत असतो! पडसाद कितीही खरा वाटला तरी तो प्रत्यक्षात आपलाच शब्द असतो. आरशात असल्याचे भासणारे रूप प्रत्यक्षात आपलेच असते!
त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठायी जो जो वेगवेगळ्या जीवांचे आकार कल्पून पाहतो, त्याला त्याला त्याच्या त्याच्या संकल्पानुसार तसतसेच खरेखुरे भूताभास होतात. ती संकल्प-निद्रा संपून मायेचा लोप झाला की मग आपोआप भूताभास नाहीसा होऊन माझे निर्मळ स्वरूप शिल्लक राहते.
आपल्याला चक्कर किंवा भोंवळ आली की सगळे जग आपल्या भोवती फिरत असल्याचा आपल्याला भास होतो. प्रत्यक्षात ते आपल्या भोवती फिरत असते का? नाही. पण आपल्याला तसा भास होतो. तसेच भूताभासाचे आहे. विविध आकार प्रकारांच्या गोष्टी आपल्याला (इंद्रियधर्मानुसार) दिसतात म्हणजेच भासतात. त्यानुसार आपल्याला वाटते की परमात्मा या इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये विभागला गेलेला आहे; आपण असेही मानायला लागतो की त्या सगळ्या भासमान वस्तूंमध्ये परमात्मा वेगवेगळा आहे आणि त्या सगळ्या वस्तू परमात्म्यामध्ये सामावलेल्या आहेत! तरीही हा सगळा संकल्पाचा म्हणजे प्रकृतिजनित इंद्रियांच्या आविष्काराचाच परिणाम आहे!
प्रत्यक्षात तसे नाही. सूर्याची आभा आपल्याला दिसते. पण ती आभा म्हणजे सूर्य असतो का? नाही. तो वेगळा असतो आणि आभा ही त्याचा एक आविष्कार असते! तिचा आधार सूर्य असतो. मृगजळ प्रत्यक्ष दिसत असले तरी तो केवळ भासच असतो, सूर्यकिरण व हवेचे विविध घनतेचे थर यांच्या संयोगाने होणारा. त्या पाण्याच्या दिसण्यात हवा दिसते का? नाही. किरण दिसतात का? नाही. पण हे दोन्ही त्या मृगजळ-भासाचे आधार असतात. त्या सगळ्यांसकट सूर्य अखंडच असतो. त्याच प्रकारे माझ्या आश्रयाने सगळे दृश्य जगत् साकारते आणि मी वेगळा नसून त्यांच्यासकट एकच सर्वव्यापी आहे. संकल्पाचा सन्निपात (म्हणजे प्रकृतिजनित इंद्रियाविष्काराची जाणीव) हे खंडित झालेले वेगळेपण दिसण्याला कारणीभूत आहे. तो संकल्प, ती जाणीव (योग-यशस्वीतेने) नाहीशी झाली की मग कुठले जीव, कुठल्या वस्तू आणि कुठले भेद? यातले काहीही शिल्लक राहत नाही. सगळीकडे अखंड असा मीच प्रत्ययास येतो! म्हणून हे धनुर्धरा अर्जुना, हे सगळे दृश्य जग माझ्याहून भिन्न नाही व मीही त्याच्याहून भिन्न नाही. सगळीकडे मी एकच अखंड आहे. (क्रमशः)
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३