गोव्यात 'संस्कृत प्रचारिणी सभा' स्थापन करणारे आणि 'बंबई हिंदी विद्यापीठा'चे अभ्यास केंद्र चालवून वंचितांना पदवी व पदव्युत्तर पदवी मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणारे अरुण काशिनाथ कुबल यांचे ३१ जानेवारी २०२५ रोजी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय
अरुण काशिनाथ कुबल हे मूळचे वेंगुर्ल्याचे. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या काळातील शाळा खात्यात शाळा तपासनीस अर्थात 'दिपोटी' होते. मुलांच्या शिक्षणाकडे ते बारकाईने लक्ष देत. अरुण यांनी शालान्त परीक्षेत यश मिळवून हिंदी भाषेतून 'साहित्य रत्नाकर' आणि 'हिंदी पारंगत' या पदव्या मिळवून 'एमए-बीएड' पात्रता प्राप्त केली. मडगाव येथील वनिता विद्यालयात अध्यापक म्हणू करिअर सुरू करून पुढे ते पेडणे येथील भगवती हायस्कूलमध्ये अध्यापन करू लागले. प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले.
अरुण कुबल यांनी 'संस्कृत विशारद' आणि 'संस्कृत कोविद' या दोन 'बीए' समकक्ष पदव्या मिळविल्या होत्या. सहज बोलता बोलता प्रसंगानुरूप एखादे संस्कृत सुभाषित त्यांच्या तोंडून अस्खलितपणे उच्चारले जाई. गुजराती भाषेतील पदविकादेखील त्यांनी घेतली होती.
१९६१ साली गोवा स्वतंत्र होऊन भारतात विलीन झाला. गोव्यातील शिक्षण पद्धतीत पोर्तुगीज भाषा शिकणे अनिवार्य होते. भारतात ब्रिटिशांनी स्वतःची इंग्रजी भाषा मुख्य बनविली तरी प्राचीन काळापासून अध्ययन आणि ग्रंथलेखन यासाठी वापरली जाणारी संस्कृत भाषा आणि अन्य प्रादेशिक भाषा यांच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. उलट कित्येक इंग्रजांनी मुद्दामहून त्या भाषा शिकून घेतल्या. गोव्यात मात्र एतद्देशीय हिंदूंची देवस्थाने, संस्कृती आणि भाषा यावर तेथील पोर्तुगीज शासकांनी वरवंटा फिरविला. परिणामी संस्कृत भाषेचे ज्ञान लोप पावत चालले.
तरुण वयातच या परिस्थितीची जाणीव अरुण कुबल यांना झाली. सुदैवाने मडगाव या गोवेकर हिंदूंच्या सांस्कृतिक आणि चळवळीच्या केंद्राच्या शहरीच त्यांना नोकरीची संधी मिळाली होती. श्री. शं. फडके आणि गोविंद काळे या अध्यापकांच्या सहकार्याने त्यांनी मडगाव येथे १९६८ साली 'संस्कृत प्रचारिणी सभा' स्थापन केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेचे अभ्यास वर्ग चालविणे हे या भाषेच्या प्रसाराचे आणि विद्यार्थ्यांना गोडी लावण्याचे प्रभावी माध्यम. शाळांच्या सहकार्यामुळे या कार्याला चांगले यश प्राप्त झाले. पुढे कुबल पेडणे येथील भगवती हायस्कूलच्या सेवेसाठी रुजू झाले. त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणाची संधी न मिळालेल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आजच्यासारखी मुक्त विद्यापीठे नव्हती. कित्येक होतकरू शिक्षणेच्छू लोक 'महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा' या पुण्यातील संस्थेतून हिंदीच्या परीक्षा देऊन मॅट्रिक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांच्या समकक्ष पात्रता मिळवीत. तत्पूर्वी, १९३८ मध्ये स्थापन झालेल्या 'बंबई हिंदी विद्यापीठा'ने हिंदी माध्यमातून ही सुविधा निर्माण केली होती. देशातील अनेक राज्यांत त्या विद्यापीठाची शाखा कार्यालये होती. हिंदी माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून बीए आणि एमए पदव्या मिळविता येत. अभ्यास दूरस्थ पद्धतीने करता येत असे. शिवाय त्या अभ्यासक्रमात इंग्रजी अथवा संस्कृत यापैकी एका भाषेचा पेपर द्यावा लागे. सर्वसाधारण दूरस्थ पदवी शिक्षणक्रमात कोणत्याच विद्यापीठाने ही व्यवस्था केली नव्हती.
या शिक्षणक्रमाचे महत्त्व आणि दर्जा ओळखून अरुण कुबल यांनी 'बंबई हिंदी विद्यापीठा'चे अभ्यास केंद्र गोव्यासाठी मिळविले. त्या विद्यापीठाचा 'गोवा राज्य संपर्क प्रमुख' म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. विद्यापीठाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचेही ते सदस्य होते. आपल्या निवासस्थानी त्याचे कार्यालय ते निवृत्तीनंतरही चालवत असत. 'राष्ट्रीय सन्मान पुरस्कारा'ने त्यांचा गौरव झाला हे योग्यच! परिस्थिती अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे उच्च शिक्षणाला वंचित राहिलेल्या उत्तर गोव्यातील शिक्षणेच्छू व्यक्तींना ही चांगलीच संधी मिळाली. अशी संधी प्राप्त करून देणारे अरुण कुबल आता या जगात राहिले नसले तरी ज्यांना त्यांच्या या उपक्रमामुळे उच्च शिक्षण घेता आले, अशा अनेकांना ते स्मरणात राहतील.
- राजेंद्रप्रसाद स. मसुरकर
रत्नागिरी (९९६०२४५६०१)