दिल्ली विधानसभा निकाल : वर्मांनी केली 'नवी दिल्ली' काबिज; दिल्लीत प्रथमच डबल इंजिनचा योग

'आप'चा दिग्गजांची उडाली धूळधाण. केजरीवाल, सिसोदिया आणि जैन यांचा पराभव. आतिशीचा विजय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 02:57 pm
दिल्ली विधानसभा निकाल : वर्मांनी केली 'नवी दिल्ली' काबिज; दिल्लीत प्रथमच डबल इंजिनचा योग

नवी दिल्ली : दिल्ली निवडणुकीच्या निकालांचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भाजप सरकार स्थापन करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजप कार्यालयात विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे.  २७ वर्षानंतर भाजप दिल्लीत पुनरागमन करत आहे. शिला दीक्षित यांच्या सत्तेत १५ वर्षे आणि केजरीवाल यांच्या सत्तेत १२ वर्षे विरोधकाची भूमिका वठवल्यानंतर आता भाजपने दिल्ली सर केली आहे.

आपचे अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून आणि सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक हरले. प्रवेश वर्मा यांच्याकडून केजरीवाल यांचा ३००० मतांनी पराभव झाला.  सत्येंद्र जैन यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे.  मात्र मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, 'आम्हाला पराभव मान्य आहे. भाजपच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. जनतेने त्यांना बहुमत दिले आहे. मला आशा आहे की भाजप लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असे पराभव स्वीकारत केजरीवाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता पक्ष मुख्यालयात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांना संबोधन करतील. दरम्यान, केजरीवाल यांचा पराभव करणारे भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

दरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत प्रवेश वर्मा यांना पत्रकारांनी छेडले असटा त्यांनी सावध भूमिका घेतली. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा सर्वानुमते ठरतो. विधीमंडळात जो काही निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल असे ते म्हणाले.  भाजप सरकार स्थापन करत आहे. येत्या काळात दिल्लीचा कायापालट होईल. सरकार स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणे, यमुना नदीकाठ स्वच्छ करणे, वायु प्रदूषण कमी करणे, वाहतूक कोंडी कमी करणे या मुद्यांवर निर्णय घेऊन काम करणार आहेत असेही ते म्हणाले. दिल्लीच्या इतिहासात प्रथमच येथे भाजपचे डबल इंजिन सरकार असेल. १९९३ साली दिल्लीत भाजप तर केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. 



 

हेही वाचा