दिल्ली विधानसभा निकाल : २७ वर्षानंतर दिल्ली सर करण्याच्या तयारीत भाजप

'आप'च्या मनसुब्यांना सुरुंग; जाणून घ्या दिल्लीतील 'या' १० हॉट सीट्सची स्थिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 12:12 pm
दिल्ली विधानसभा निकाल : २७ वर्षानंतर दिल्ली सर करण्याच्या तयारीत भाजप

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.  गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्ष विविध कारणांमुळे मागे पडल्याचे दिसत आहे.  येथे आप आणि भाजपमध्येच थेट टक्कर होत असल्याचे दृष्टीस पडत असून, काँग्रेसने पराभव स्वीकार देखील केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमुळेच अनेक ठिकाणी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना धक्का बसत आहे. सध्या मतमोजणीत भाजप ४१ तर आप २९ मतदारसंघांत आघाडीवर.

कल पाहता भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत असल्याचे दिसून येत आहे, तर 'आप'ला २५ जागा मिळतील असा कयास बांधला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस पुन्हा एकदा आपले खाते उघडू शकली नाही आणि त्यांना एकाही जागेवर आघाडी मिळाली नाही.

तर,  दिल्ली निवडणुकीतील महत्वाच्या अशा  १० हॉट सीट्सची स्थिती जाणून घेऊयात. 

१) नवी दिल्ली:  या जागेवरून मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर, अरविंद केजरीवाल ३८६ मतांनी आघाडीवर आहेत. काही तासांपूर्वी या जागेवरून भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा आघाडीवर होते. या जागेवरून काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे.


२) कालकाजी: निवडणूक आयोगाच्या सकाळी ११.१५ वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप उमेदवार रमेश बिधुरी १६३५ मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवरून आपच्या उमेदवार आतिशी निवडणूक रिंगणात आहेत. तर काँग्रेसने अलका लांबा यांना तिकीट दिले आहे.



३) जंगपुरा: या जागेवर आपचे उमेदवार मनीष सिसोदिया मजबूत दिसत आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत ते २३४५ मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवरून भाजपने तरविंदर सिंग मारवाह यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने फरहाद सुरी यांना तिकीट दिले आहे. 


४) बिजवासन: आप सोडून भाजपमध्ये आलेले कैलाश गेहलोत या जागेवरून मतमोजणीच्या पाचव्या फेरीपर्यंत ३०२५ मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवरून आपने सुरेंद्र भारद्वाज यांना तिकीट दिले होते, तर काँग्रेसने देवेंद्र सेहरावत यांना उमेदवारी दिली होती.


५) शकूर बस्ती: आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते सत्येंद्र जैन या जागेवरून पिछाडीवर आहेत. भाजपने या जागेवरून कर्नैल सिंह यांना तिकीट दिले होते, जे चौथ्या फेरीनंतर ९६०७ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसने येथून सतीश लुथरा यांना तिकीट दिले होते.



६) ओखला: चौथ्या फेरीनंतर आपचे उमेदवार अमानतुल्ला खान ८७२५ मतांनी आघाडीवर आहेत. एआयएमआयएमचे शफी-उर रहमान दुसऱ्या स्थानावर आहेत. भाजपने येथून मनीष चौधरी यांना तिकीट दिले होते, तर काँग्रेसने अरिबा खान यांना उमेदवारी दिली होती. 


७) पटपडगंज: आपमध्ये सामील झालेले अवध ओझा यांना या जागेवरून मोठा धक्का बसला आहे. पाचव्या फेरीपर्यंत मतमोजणी झाल्यानंतर या जागेवरून भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी १२ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवरून काँग्रेसने अनिल कुमार यांना तिकीट दिले होते. 


८) ग्रेटर कैलाश: मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर या जागेवरून निवडणूक लढवणारे आपचे दिग्गज नेते सौरभ भारद्वाज भाजप उमेदवार शिखा रॉय यांच्यापेक्षा ४,४४० मतांनी मागे आहेत. काँग्रेसने या जागेवरून गरवीत सिंघवी यांना तिकीट दिले आहे.


९) करावल नगर:  या जागेवरून भाजप नेते कपिल मिश्रा २० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. आपने येथून मनोज त्यागी यांना तिकीट दिले होते, तर काँग्रेसने पीके मिश्रा यांना उमेदवारी दिली होती.


१०) बादली : या जागेवरून भाजप नेते अहिर दीपक चौधरी आघाडीवर आहेत. सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार देवेंद्र यादव पुढे होते, पण आता ते सुमारे ४ हजार मतांनी मागे आहेत. या जागेवरून 'आप'ने अजेश यादव यांना तिकीट दिले होते.


एकंदरीत पाहता, भाजपने 'आप'च्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. आता २७ वर्षांच्या वनवासानंतर ते पुन्हा सत्ता काबिज करण्याच्या तयारीत आहेत. 


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा