कट्टर प्रामाणिक असे स्वतःचे वर्णन करणारे आपचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड झाले. सामान्य मतदारांचा झालेला त्या पक्षाबद्दलचा भ्रमनिरास यावेळी भाजपला किती जागा मिळवून देतो, ते आज स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणातील उल्लेखनीय विजयानंतर, दिल्लीची सत्ता हस्तगत करणे भारतीय जनता पक्षाला शक्य होईल का, याचा निर्णय आज जाहीर होईल. दोन वेळा सलग नेत्रदीपक विजय प्राप्त केलेल्या आम आदमी पक्षाला तिसऱ्या वेळी दिल्ली आपल्याकडे राखता येईल का, या प्रश्नाचे उत्तरही आजच्या निकालात मिळणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे दिल्ली संघप्रदेशाच्या ७० सदस्यांच्या विधानसभेत २०१५ मध्ये ६७ तर २०२० मध्ये ६३ जागा मिळवून भाजप आणि काँग्रेसला या पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामागे अर्थातच या पक्षाच्या नाविन्याचे आकर्षण मतदारांना होते. दिल्लीतील जनतेला नवा पर्याय उपलब्ध झाल्यावर दोन जुन्या राजकीय पक्षांभोवती फिरणाऱ्या राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बरेच बदल झालेले दिसतात. नेते बदलले, कारभार बदलला आणि अखेर सर्वांचेच पाय मातीचे का, असा प्रश्न मतदारांना पडला. कट्टर प्रामाणिक असे स्वतःचे वर्णन करणारे आपचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड झाले. सामान्य मतदारांचा झालेला त्या पक्षाबद्दलचा भ्रमनिरास यावेळी भाजपला किती जागा मिळवून देतो, ते आज (शनिवारी) स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपचा २७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणणारा विजय ठरेल. हा अंदाज खरा ठरल्यास भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्षाची (आप) राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सुमारे दशकभराची सत्ता संपुष्टात आणून दिल्ली विधानसभा पुन्हा मिळविण्याच्या तयारीत आहे. 'पोल ऑफ पोल'नुसार हिंदुत्वनिष्ठ भाजप पक्षाला ४३ जागांवर समाधान मानावे लागेल तर 'आप' २६ जागांवर पिछाडीवर आहे. एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केवळ एक जागा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही वैयक्तिक सर्वेक्षणांमध्ये मात्र अधिक चुरशीची लढत असल्याचे दिसून आले असून 'आप'ने एक्झिट पोल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 'आप'बाबत एक्झिट पोल कधीच बरोबर ठरले नाहीत. प्रत्येक वेळी 'आप'ने प्रचंड मताधिक्याने सत्ता मिळवली आहे आणि यंदाही यापेक्षा वेगळी स्थिती नाही, असा आप नेत्यांचा दावा आहे.
'आप'चा पराभव हा प्रस्थापितविरोधी पक्ष आणि त्याचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल, ज्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे त्यांना २०१५ मध्ये दिल्लीत सत्तेवर येण्यास मदत झाली. त्यानंतर ते राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे अस्तित्व वाढवू पाहत आहेत. केजरीवाल यांनी २०१२ मध्ये या पक्षाची स्थापना केली आणि आम आदमी किंवा सामान्य माणसासाठी धर्मयुद्ध म्हणून या पक्षाची स्थापना केली आणि आरोग्य आणि विजेपासून पाणी आणि शिक्षणापर्यंत मूलभूत सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तुलनेने खराब कामगिरी नंतर भाजपला दिलासादायक निकालाची अपेक्षा आहे. प्रचारादरम्यान भाजप, आप व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मोफत पाणी आणि विजेपासून रोख सवलतीपर्यंत फुकटेगिरीची आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 'आप'चे प्रशासन मॉडेल लोकप्रिय लोककल्याणकारी योजनांवर आधारित असून भाजप आणि कॉंग्रेसला 'स्वच्छ' राजकीय पर्याय म्हणूनही स्वत:चा प्रचार केला. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची दुसरी टर्म अडचणीत आली आणि मुख्यमंत्री असलेले केजरीवाल आणि त्यांच्या जवळच्या दोन मंत्र्यांना बराच काळ तुरुंगवास भोगावा लागला. ही अटक तथाकथित दारू घोटाळ्यातून झाली होती. 'आप'ने हे आरोप फेटाळून लावले असले तरी शीशमहल असे नाव असलेले भव्य निवासस्थान मुख्यमंत्र्यांनी बांधल्याचा प्रकार भाजपने मतदारांसमोर आणून त्यांना विचार करायला भाग पाडले आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या दिल्ली रणनीतीमुळे इंडी आघाडी संपुष्टात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देशाच्या राजधानीत फारसे मताधिक्य मिळवणारे नसल्याने पक्षाच्या प्रचाराच्या व्हिडिओत त्यांना वगळण्यात आले. इंडी आघाडीतील जवळजवळ प्रत्येक पक्षाने खर्गे यांना दुखावले आहे. महाराष्ट्र निवडणुकीतील पराभवानंतर खर्गे यांना इंडी परिवारातील वाढती नाराजी आणि अस्वस्थता जाणवू लागली. मात्र, पक्षांतर्गत समीकरणे अशी होती की, खर्गे यांना इंडी आघाडी तुटण्यापासून वाचवता आली नाही. त्याहीपेक्षा रंजक आणि कदाचित विचित्र बाब म्हणजे सोनिया आणि राहुल गांधी या दोघांचाही विश्वास त्यांना कायम असला तरी काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या डावपेचांमुळे त्यांना आघाडी वाचवण्याची फारशी संधी मिळत नाही. दिल्ली विधानसभेचे निकाल काहीही लागले तरी काँग्रेसला अथवा इंडी आघाडीला सावरणे आता कठीण बनले आहे.