दामोदर घाणेकार चवताळले, त्याचे कारण प्रसाद कुलकर्णी नव्हे. आज कोकणी समर्थक परत परत ‘गोयची अस्मिता’ ‘विलीनीकरण’ ‘मगो पक्ष’ ही पुराणाची वांगी परत तळायला घेत आहेत. याचे कारण वेगळे आहे. त्याचे कारण हे ‘कोकणी मुक्ती’ची नवी चळवळ स्वरुपात येत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी ‘घरात बोलणारी कोकणी’ असा उल्लेख करून वेगळीच फोडणी घातली आहे.
कधी कधी असे होते की ‘खाज’ एकीकडे पण ‘खाजविणे’ भलतीचकडे असे होते. मुख्यमंत्र्यांनी ‘घरात बोलणारी कोकणी’ या नव्या विषयाला सार्वजनिक स्वरुपात आणले. राजभाषा दिन कार्यक्रमात जाऊन कोकणीवाल्यांचे उघडपणे कान टोचले. अशा वेळी कोकणी हे एक आपलेच ‘भाट’ असे गृहीत धरणारे काही ‘भाशा भाटकर’ आपली वळवळ करणार हे अपेक्षित होते. झाले तसेच, स्वत:ला कोकणीचे विश्वकोश समजणारे दामोदर घाणेकार यांचा ‘भाशावाद’ या मथळ्याखाली लिहिलेला एक कोकणी लेख व्हायरल झाला आहे. त्यांनी तो लेख आपल्या फेसबुक वॉलवरही लावला आहे. यात त्यांनी वाळपई येथे झालेल्या गोमंतक मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या प्रसिद्ध साहित्यिक व गीतकार प्रसाद कुलकर्णी यांना परत पणजीत आल्यास त्यांना बाभळीच्या काठीचा ‘प्रसाद’ खावा लागेल, अशी धमकी दिली आहे. कारण काय तर त्यांनी आपल्या भाषणात, ‘कोकणी - मराठी वादामुळे दोन्ही भाषांचे नुकसान झाले आहे,’ असे वक्तव्य केले म्हणून. मी म्हणतो, प्रसाद कुलकर्णी खरोखरच चुकीचे बोलले. त्यांनी असे न म्हणता, ‘कोकणी - मराठी वादानंतर जे सरकारी लाभ दोन्ही भाषांना मिळू लागले, त्यावर दोन्ही बाजूचे जे सन्माननीय नागोबा आतापासून कोंडाळे करून बसले आहेत, त्यांच्यापासून दोन्ही भाषांचे नुकसान झाले आहे,’ असे म्हणायला हवे होते. या सन्माननीय नागोबात दामोदर केशव कामत घाणेकार (दामबाब) हे एक आहेत.
आता दामोदर घाणेकारांना चक्क नागोबा म्हटले म्हणून त्यांचा अपमान केला, असे काही लोक दावा करू शकतील. नागाला आपण आदराने ‘नागोबा’ म्हणतो. दामोदर घाणेकारांना मी नाग म्हटलेले नाही. नाग हा सगळ्यात कमजोर दृष्टी असलेला साप आहे. त्याला पूर्ण आकृती दिसत नाही, पुढे हलणाऱ्या वस्तूकडे पाहून डोलतो. त्याचे फणा काढीत डोलणे व मध्ये मध्ये फुत्कारणे याचसाठी असते की, त्याच्या मते समोरच्याने आपल्यावर हल्ला केल्यास आपण त्याला डंख मारायला तयार असले पाहिजे. माझ्या वाटेला जाऊ नका, मी आपला विषारी चावा घेईन, असा इशारा तो आपल्या फुत्कारण्यातून देत असतो. प्राणीमित्र सांगतात ते खरे आहे की त्याच्या वाटेला गेले नाही तर तो आपल्याला काही करत नाही. पण आपला चुकून त्याच्या शेपटीवर पाय पडला - त्याला ‘चुकून व मुद्दाम’ हा फरक त्या बिचाऱ्याला कळत नाही - परिणामी अनेकांचा जीव जातो. त्यासाठी उपाय म्हणून आधी या नागोबाला ठेचले. आता प्राणीमित्र त्यांना पकडून रानात सोडतात. ‘चुट्टेचो सोरोप’ नाचविणाऱ्या दामोदर घाणेकारांसारख्या दोन्ही बाजूच्या नागोबांना नेऊन रानात सोडणे, दोन्ही भाषांच्या हिताचे आहे.
दामोदर घाणेकार चवताळले, त्याचे कारण प्रसाद कुलकर्णी नव्हे. आज कोकणी समर्थक परत परत ‘गोयची अस्मिता’ ‘विलीनीकरण’ ‘मगो पक्ष’ ही पुराणाची वांगी परत तळायला घेत आहेत. याचे कारण वेगळे आहे. त्याचे कारण हे ‘कोकणी मुक्ती’ची नवी चळवळ स्वरुपात येत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी ‘घरात बोलणारी कोकणी’ असा उल्लेख करून वेगळीच फोडणी घातली आहे. यात त्यांनी आपले गुरू स्व. मनोहर पर्रीकर यांचे री ओढली आहे. ‘भेंब्रे कोकणी मी वाचत नाही,’ असे ते सांगत होते. ते सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी गोवादूत हे मराठी दैनिक पुढे आणले.
ज्याप्रमाणे आजच्या काही भाटकारांच्या पूर्वजांनी शिक्षणाच्या आधारे मिळेल त्या जमिनीच्या सर्वे नंबरवर आपले नाव घुसवले, त्याचप्रमाणे काहींनी लिखित स्वरुपातील कोकणीच्या ‘सर्वे नंबर’वर आपले नाव कोरले. आज येथे मराठी नसती तर माझ्यासारख्या मुंडकाराच्या मुलाला ‘यांनी जमीनच नव्हे तर माझी भाषाही बळकावली आहे’ याची जाणीव झाली नसती. मुंडकार कायद्याखाली ‘कसेल त्याची जमीन झाली’ त्याच धर्तीवर ‘कसेल त्याची कोकणी’ होईल का, अशी असुरक्षितता दामोदर घाणेकारांसारख्या स्वत:ला कोकणीचे भाटकार समजणाऱ्यांना झाली आहे.
दामोदर घाणेकारांना उजवी विचारसरणी पटत नाही, त्यामुळे शिशुपालाचे शंभर अपराध म्हणजे काय हे माहीत नसावे. अन्यथा स्वत:ला, दैनिकाच्या संपादकांना अडचणीत आणणारे लिखाण केलेच नसते. धारदार व टोकदार वस्तू या कायद्याने धोकादायक हत्याराच्या भाषेत येतात. ही वापरून इजा करण्याची धमकी देणे अदखल पात्र गुन्हा असून, अशी पोलिसांकडे तक्रार आल्यास खबरदारीच्या कारणास्तव धमकी देणाऱ्यास पोलीस अटक करून किंवा नोटीस देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करता येते. अशा वेळी न्यायदंडाधिकारी त्यांच्याकडून असे करणार नाही असे लिहून दिल्यावरच सुटका करतात. येथे प्रसाद कुलकर्णी यांनी मुंबई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यास, घाणेकारांनाच एक तर मुंबईवारी करावी लागणार. येथे भाषांच्या दोन गटांत हिंसक चिथावणी दिल्याची तक्रार संमेलन आयोजकांनी पणजी पोलीस स्थानकात केल्यास, दामोदर घाणेकारांना रामकृष्ण जल्मी, सुभाष वेलिंगकर, दत्ता नायक यांच्या ओळीत बसावे लागणार आहे.
दामोदर घाणेकार यांनी आपल्या लेखाचा शेवट ‘संसदेन कोकणीक आठव्या परिशिष्टाक मानाचो पाठ दिवन भाशावाद सदा खतीर लासलो आनी पुरलो. पुण वादाची वाय तुमच्या पोटांत धुमसता आनी केन्ना ती फूस फूस करीत अशी भायर सरता...’ असा केला आहे. स्वत:ला विश्वकोश समजणाऱ्याला, फिरवून फिरवून सांगण्यापेक्षा सरळ ‘फुसकी’ हा शब्द वापरता आला असता. सर्व सोडून फुसक्याची घाण ‘हुंगणाऱ्या’ अशा 'घाण'करी प्रवृत्तीपासून कोकणी मुक्त झालीच पाहिजे.
- डॉ. मधू घोडकिरेकर