बदलीचा आदेश टाळण्याचे धाडस या कर्मचाऱ्यांमध्ये कुठून येते, हेही शोधायला हवे. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनही अशा कर्मचाऱ्यांना बदलीनंतर नव्या जागी का गेला नाहीत, अशी विचारणा करत नाही. त्यामुळेच हे कर्मचारी पोलीस खात्याचे जावई झाले आहेत.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरप्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. आठ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, बडतर्फीची कारवाई आतापर्यंत झाली आहे. सिद्दीकी सुलेमानला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या पोलिसाने तर खात्याची पूर्ण नाचक्की केली होती. त्यातून पोलीस खाते सावरत असतानाच एका महिला पोलिसाने चलनाचे सुमारे १७ लाख रुपये परस्पर लांबवल्याची घटना समोर आली. हे सगळे सुरू असताना पोलीस खात्याचे मुख्यालय अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी एक आदेश जारी करून सगळ्या पोलीस खात्यालाच हादरा दिला आहे. बदली झालेल्या पोलिसांनी त्वरित आपली सध्याची जागा सोडून नव्या जागेवर ताबा घ्यावा अन्यथा या महिन्याचे वेतनही मिळणार नाही, असे निर्देश जारी केल्यामुळे शेकडो पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. एकाच जागी राहून पोलीस दलाचे जावई झालेले एक दोन नव्हे तर किमान अडीचशे कर्मचारी गेल्या तीन बदल्यांमधून समोर आले आहेत. फक्त तीन बदल्यांमधून इतके जावई असल्याचे दिसून आले तर मग आठ हजाराच्या पोलीस दलात किती जावई असतील याची कल्पना करा.
पोलीस खात्यातला भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचे काम इथूनच सुरू होते. बदली झाली तरी कर्मचारी आपली मूळ जागा सोडून दुसऱ्या जागी जात नाही. बदलीचा आदेश येऊनही जाग्यावरून हलत नसलेल्या पोलिसांना त्याच जागेवरील पगार मिळत होता. त्यामुळे कितीतरी वर्षे एकाच जागेवर असलेले पोलीस हजारोंच्या संख्येने आहेत. २०२४ मध्ये तीनवेळा बदल्यांचे मोठे आदेश काढण्यात आले. पहिला आदेश फेब्रुवारी २०२४ मध्ये ज्यात २६४ जणांच्या बदल्या केल्या. दुसरा आदेश जुलै २०२४ मध्ये काढला ज्यात ४१६ जणांच्या बदल्या झाल्या तर तिसरा बदलीचा आदेश सप्टेंबर २०२४ मध्ये काढण्यात आला ज्यात ७०४ जणांच्या बदल्या केल्या गेल्या. यातील काही पोलिसांनी आजही आपली जुनी जागा सोडलेली नाही. म्हणजेच बदलीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. पूर्वीची जागा न सोडणारे सुमारे २३० पोलीस कर्मचारी आहेत. काही पोलीस कर्मचारी पोलीस खात्याच्या आदेशाला किंमत देत नाहीत. बदलीचा आदेश आला की सुट्टीवर जातात. पुन्हा काही दिवसांनी वशिल्याने मूळ जागी येतात.
काहीजण बदली झालेली असतानाही जुन्याच जागी काम करत असतात. यातील काही मर्जीतील असतात, त्यामुळेच बदलीच्या आदेशाची थट्टा होते. बदलीच्या आदेशाला न जुमानणाऱ्या पोलिसांना नेल्सन अल्बुकर्क यांनी चांगला धक्का दिला आहे. यापुढे अशा कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बदलीच्या ठिकाणाहूनच काढण्यात येणार असल्यामुळे जे कर्मचारी बदलीवर गेलेले नाहीत, त्यांना पगार मिळणार नाही. अशा प्रकारचा धाडसी आदेश काढण्यासाठी अल्बुकर्क यांनाही रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. पण त्यांनी हा आदेश वरिष्ठांशी चर्चा करूनच काढल्याची शक्यता आहे. कारण पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनाही कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा आवडत नाही. त्यांनी वेळोवेळी पोलीस खात्यात सुधारणा करण्यासाठी काही उपाय केले. बदली झालेल्यांनी आपापल्या जागी जावे ही एक सुधारणाच आहे. बदली झालेले पोलीस नव्या जागी जात नाहीत तोवर नव्या बदलीचा आदेश काढू नये, अशा सूचना पोलीस महासंचालकांनी केल्यामुळे सध्या पोलीस प्रशासनावर पेच आहे. त्यामुळेच अल्बकर्क यांनी आदेश जारी करून फेब्रुवारी महिन्यापासून बदलीवर न जाणाऱ्यांना पगारच न मिळण्याची व्यवस्था केली आहे. वर्षभरात जे २३० पोलीस कर्मचारी आपल्या नव्या जागी गेलेले नाहीत ते आता जातील अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच पोलीस खात्यात नव्या बदल्या होऊ शकतात.
बदलीचा आदेश टाळण्याचे धाडस या कर्मचाऱ्यांमध्ये कुठून येते, हेही शोधायला हवे. राजकीय नेत्यांच्या दबावांमुळे पोलीस प्रशासनही अशा कर्मचाऱ्यांना बदलीनंतर नव्या जागी का गेला नाहीत, अशी विचारणा करत नाही. त्यामुळेच हे कर्मचारी पोलीस खात्याचे जावई झाले आहेत. एकाच जागी राहून आपली तुंबडी भरण्याचे काम काहीजण करत असतात. अशा कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक अलोक कुमार आणि अधीक्षक अल्बुकर्क यांनी चांगला दणका दिला आहे. नव्या जागेवर जात नाही तोपर्यंत पगार नाही, हेच धोरण पोलीस खात्याने कायम अवलंबले तर बदलीचा आदेश टाळण्याचे धाडस कोणी करणार नाही.