चीन, मेक्सिको आणि कॅनडावर आहे निशाणा, ब्रिक्स परिषदेतील देशांना सूचक इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिकोमधून आयात केलेल्या वस्तूंवर भारी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी शनिवारी एका आदेशावर स्वाक्षरी केली असून याद्वारे मेक्सिको आणि कॅनडामधून आयात केलेल्या वस्तूंवर २५ टक्के आणि चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर १० टक्के शुल्क लागू केले आहे. या निर्णयामुळे २.१ ट्रिलियन डॉलरच्या व्यापारावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केल्यानुसार मंगळवारी रात्री १२.०१ वाजल्यापासून हा दर लागू होईल.
हा निर्णय लागू करण्यासाठी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याची मदत घेतली आहे. या कायद्यानुसार, राष्ट्रपतींना अनेक व्यापक अधिकार प्राप्त होतात, याद्वारे ते व्यापाराशी संबंधित कोणत्याही संकटाचा सामना करू शकतात. हे टॅरिफ धोरण लागू करून त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे शुल्क लागू केल्यानंतर ट्रम्प म्हणाले.
सीमा सुरक्षा आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात अपयशी ठरलेल्या देशांवर दबाव आणण्यासाठी हा दर लागू करण्यात आला आहे. बेकायदेशीर स्थलांतरित आणि प्राणघातक औषधे, विशेषत: फेंटॅनाइलमुळे आमच्या नागरिकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. यामुळे या देशांवर कठोर पावले उचलण्यासाठी दबाव येईल आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असा विश्वास ट्रम्प प्रशासनाला आहे.
कॅनडा आणि मेक्सिकोवर स्वतंत्र अटी लादल्या
व्हाईट हाऊसनुसार, कॅनडातून येणाऱ्या ऊर्जा उत्पादनांवर फक्त १० टक्के शुल्क लागू केले जाईल, तर मेक्सिकोच्या ऊर्जा आयातीवर २५ टक्के शुल्क लागू केले जाईल. याव्यतिरिक्त, कॅनडातून ८०० डॉलर पेक्षा कमी किमतीच्या छोट्या शिपमेंटसाठी "डी मिनिमिस" टॅरिफ सूट देखील काढून टाकण्यात आली आहे. जर या देशांनी यूएस टॅरिफच्या विरोधात कोणतीही प्रत्युत्तराची कारवाई केली तर अमेरिका शुल्क दर आणखी वाढवू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडावर भारी शुल्क लादण्याच्या निर्णयानंतर कॅनडानेही अमेरिकन उत्पादनांवर टॅरिफ लादला आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जाहीर केल्यानुसार त्यांचे सरकार अमेरिकन उत्पादनांवर १५५ कॅनेडियन अब्ज डॉलर किमतीचे शुल्क लादणार आहे. केवळ कॅनडाच नाही तर मेक्सिकोनेही अमेरिकेविरोधात कडक भूमिका घेतली आहे .आम्ही थंड मनाने वागत आहोत, परंतु आम्ही आमची अर्थव्यवस्था आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यास तयार आहोत. मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम यांनी सांगितले. शीनबॉम यांनी अमेरिकेने लादलेले शुल्क अयोग्य असल्याचे वर्णन केले. आम्ही आमच्या देशावर लावलेले खोटे आरोप कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. मेक्सिकोने टॅरिफ आणि नॉन-टेरिफ उपाय लागू करण्याचा विचार करून आधीच "प्लॅन बी" तयार केला आहे, असे शीनबॉम म्हणाले.
व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती वाढली आहे का?
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे प्रमुख व्यापारी भागीदार नाराज होऊ शकतात. मेक्सिको आणि कॅनडाने आधीच प्रतिशोधात्मक टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे, तर चीन आपल्या व्यापार हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी मजबूत उपाययोजना करू शकतो. या निर्णयाचा परिणाम अमेरिकन ग्राहकांवरही होऊ शकतो, कारण त्यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतालाही याचा काही अंशी चटका बसू शकतो.
अन्य एक महत्त्वाची बाब म्हणजे, मागेच ब्रिक्स परिषदेतील देशांनी डॉलरला प्रतिस्पर्धी म्हणून युरोच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांचे वेगळे चलन सुरू करण्यासाठी चक्रे गतिमान केली होती. यानंतर डॉलरशी प्रतिस्पर्धा करण्याची कोणी आगळिक केल्यास त्या देशावर किंवा संघटनेवर १०० टक्के टॅरीफ लादले जाईल अशी सरळसोट धमकीच ट्रंपने दिली होती. दरम्यान सौदी अरबने यानंतर एक विधान जारी करत, तसे काही करण्याचा कोणताही मनसुभा नसल्याचे म्हटले होते. .