उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत २८,००० लोक ठार झाले असून तब्बल दीड लाख लोकांना स्थलांतरण करावे लागले आहे.
ओमदूरमान : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान ओमदुरमनच्या सबरीन मार्केटमध्ये शनिवारी १ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात किमान ५६ लोक ठार झाले, तर १५८ हून अधिक जखमी झाले. सुदानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. एका महितीनुसार, हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) ने केला आहे. हा गट सुदानी सैन्याविरुद्ध दीर्घकाळ युद्ध करत आहेत. मात्र, या हल्ल्याबाबत आरएसएफकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
सुदान सरकारचे प्रवक्ते आणि सांस्कृतिक मंत्री खालिद अल-अलिसर यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे घोर उल्लंघन असल्याचे व मिलिशियाचा हा आणखी एक रक्तरंजित गुन्हा आहे असे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक महिला आणि मुलांचाही मृत्यू झाल्याचे खालिद अल-अलिसर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.
एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. सुदानमधील लष्करी आणि निमलष्करी दलांमधील वादाचे रूपांतर एप्रिल 2023 मध्ये खुल्या युद्धात झाले. तेव्हापासून राजधानी खार्तूम आणि इतर शहरांमध्ये हिंसाचार सुरूच आहे, यामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या संघर्षात आतापर्यंत २८,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेक भागात लोक उपासमारीने त्रस्त आहेत.