चांगल्या शॅक मालकांनी बेकायदा गोष्टींची माहिती सरकारला द्यायला हवी. सरकारनेही ही माहिती गोपनीय ठेवून चौकशी करून पुढील कारवाई करावी, तसे झाले तरच गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील गैरकृत्यांना आळा बसेल.
शॅकवर खून झाले, हल्ले झाले तरी त्यांच्या वाटेला न जाणाऱ्या सरकारला आता जाग आली. ‘गोवन वार्ता’ने मंगळवार २८ जानेवारीच्या अंकात ‘सुरक्षा यंत्रणा सजग आहे का?’ या प्रखर अग्रलेखातून सरकारच्या धोरणांवर आसूड ओढला होता. सरकार कारवाईत कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्यामुळे किनारी भागात चाललेल्या अनेक गैरप्रकारांना मिळणारे संरक्षण गोव्यासाठी घातक असल्याची प्रखर भूमिका ‘गोवन वार्ता’ने मांडली होती. छोट्याशा कारणावरून हरमलमधील युवकाचा खून हा शॅक व्यावसायिकांची दादागिरी अधोरेखित करतो. कितीही गंभीर प्रकरण असले तरी कोणालाही कायदा हातात घेऊन खून करण्याचा अधिकार सरकारने दिलेला नाही. यापूर्वी कळंगुटच्या शॅकमध्ये महिन्याभरापूर्वी एका पर्यटकाला मारहाण करून त्याचा खून केला गेला. या दोन्ही घटनांशी संबंधित शॅक अजूनही सुरू आहेत. त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. पर्यटन खात्याने शेवटी धाडस दाखवले. हरमलमध्ये ज्या शॅकवर स्थानिक युवकाचा खून झाला होता, तो शॅक मोडून टाकण्याचा आदेश दिला. शॅक ज्या व्यक्तीला दिला होता, त्या मूळ मालकाला २५ लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेशही पर्यटन खात्याने दिला आहे. या निर्णयासाठी सरकारचे आणि पर्यटन खात्याचे अभिनंदन व्हायलाच हवे. गोव्याच्या हितासाठी असे निर्णय घेतल्यास लोकही त्याला पाठिंबा देतील, ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यायला हवी.
गोव्यातील किनारी भागात सुरू असलेली दादागिरी ही फक्त रेस्टॉरंट, शॅक मालकांचीच नव्हे तर ड्रग्ज पुरवठा करणारे, नाईट क्लब चालवणारे आणि वेश्याव्यवसायात गुंतलेल्या अनेकांकडून यापूर्वी पर्यटकांना आणि स्थानिकांनाही मारहाण, धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. गोव्यातील पर्यटन स्वच्छ करायचे असेल तर अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांना वेळीच मूठमाती द्यायला हवी.
गोव्यातील लोकांना शॅक मंजूर होतात. आपल्या नावावर शॅक घेऊन ते गोव्याबाहेरील लोकांना चालवण्यास देणाऱ्यांना यापुढे कधीच शॅक मिळणार नाही, याची व्यवस्था व्हायला हवी. त्यासाठी गुप्त पद्धतीने शॅक मालकांचा सर्वे व्हायला हवा. शॅक दुसऱ्यांना चालवण्यास देणाऱ्यांचा सर्वे होईल असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केल्यामुळे सगळे शॅक मालक सावध झाले आहेत. हा सर्वे गुप्त पद्धतीने व्हायला हवा, तरच शॅक कोण चालवतात ते स्पष्ट होईल. शॅकच्या आडून गैरधंदे चालवणारे गोव्यातील शॅक मालक नसतात. हिमाचल, दिल्ली, मुंबईहून आलेले लोक गोव्यातील शॅक चालवतात. किनारी भागातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शॅक हे बाहेरील लोकांच्या हाती आहेत. त्यांना शोधून काढण्यासाठी पर्यटन खात्याने उघडपणे मोहीम चालवली तर हाती काही लागणार नाही. त्यासाठी पद्धतशीर सर्वे व्हायला हवा. अचानक निरीक्षण करून त्याच क्षणी परवाना रद्द करण्याची कारवाई व्हायला हवी. गोव्यातील व्यावसायिकांनीही आपले हे चांगले व्यवसाय बाहेरील लोकांच्या हाती देऊन बेसावध होऊ नये. अन्यथा हरमलच्या शॅक मालकाला जसा २५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला तशी वेळ इतरांवरही येणार आहे, याची जाणीव ठेवावी.
एक दोन शॅक मालकांनी केलेल्या गैरकृत्यांमुळे सरसकट सर्वच शॅक मालकांना वाईट म्हणता येणार नाही. चांगले शॅक व्यावसायिक अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत आहेत. मुकाटपणे आपला व्यवसाय करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांना शॅक विकणाऱ्यांबाबत अशा प्रामाणिक लोकांनीही तक्रारी करायला हव्यात. अशा प्रकारांना विरोधही करायला हवा. कारण आज दोन शॅकमध्ये दोन खून झाले. कित्येकांना मारहाण होते. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी इतर चांगल्या शॅक मालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण गोव्याच्या पर्यटनाची बदनामी ही अशा गैरमार्गाने व्यवसाय करणाऱ्यांमुळेच होत आहे. या काही मूठभर लोकांमुळे गोव्याची आणि गोव्यातील पर्यटन व्यवसायाची बदनामी होत आहे. ती रोखण्यासाठी आणि गोवा हे चांगले पर्यटन स्थळ आहे, हे सिद्ध करण्यासाठी गैरमार्गाने शॅक चालवणाऱ्यांना अद्दल घडवण्याची गरज आहे. त्यासाठीच चांगल्या शॅक मालकांनी बेकायदा गोष्टींची माहिती सरकारला द्यायला हवी. सरकारनेही ही माहिती गोपनीय ठेवून चौकशी करून पुढील कारवाई करावी, तसे झाले तरच गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील गैरकृत्यांना आळा बसेल.