सुरक्षा यंत्रणा सजग आहे का?

आतापर्यंत चार महिन्यांत दोन खून झाले. चार जणांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. या सगळ्या गोष्टी पाहता गोवा पोलीस, गोवा पर्यटन खाते यांनी संयुक्तपणे काही उपाय आखण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा खुनासारखे गुन्हे घडत आहेत त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खरोखरच सजग आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

Story: संपादकीय |
27th January, 09:45 pm
सुरक्षा यंत्रणा सजग आहे का?

कळंगुटमधील एका शॅकवर पंचवीस दिवसांपूर्वी एका पर्यटकाचा खून झाला. अटकेची कारवाई झाली. तो शॅक अजूनही सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये एका शॅकवर पशुचिकित्सकांना मारहाण करण्यात आली. काहीजणांना अटक झाली, पण शॅकवर कारवाई झाली नाही. रविवारी संध्याकाळी हरमल समुद्र किनाऱ्यावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका स्थानिक युवकाचा बळी गेला. शॅक मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मरेस्तोवर मारहाण केली. पोलिसांनी काहीजणांना अटक केली. एका बाजूने गोव्याच्या पर्यटनाची बदनामी होत असताना दुसऱ्या बाजूने शॅक मालक, शॅकचे कामगारच पर्यटकांना मारहाण करून गोव्याची बदनामी करण्यास हातभार लावत असताना गेल्या चार महिन्यात शॅकमुळे दोन खूनही झाले. गोव्याची ही एवढी विदारक स्थिती का आणि कोणामुळे होत आहे, त्याचे उत्तर सरकार शोधणार आहे की अजूनही काही खून होण्याची वाट पाहणार आहे? किनारी भागातील हप्तेखोरांकडून, बाऊन्सर, सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या नावाने निर्माण झालेल्या नव्या जुन्या गुंडांमुळे पोलीस, पर्यटन खाते यांचे नियंत्रण किनारी भागातील व्यवसायांवर राहिले नाही, असेच भीषण चित्र सध्या दिसत आहे. अन्यथा गोव्यातील शॅक्सवर गेल्या तीन चार महिन्यांतच एवढ्या मोठ्या प्रमाणात असे मोठे गुन्हे घडले नसते.

हरमल समुद्र किनाऱ्यावर अमर बांदेकर या स्थानिक युवकाचा खून होतो. गजबजलेल्या समुद्र किनाऱ्यावर इतके शॅक्स आणि इतर व्यवसाय असतानाही या भांडणात कोणी हस्तक्षेप करत नाही किंवा त्याला वाचवण्यासाठीही कोणी जात नाही. शॅक मालक आणि कामगारांनी त्याला एकट्याला गाठून जीव जाईपर्यंत मारहाण केली. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे हरमल समुद्र किनाऱ्यावर शॅक मालक हवे त्या पद्धतीने टेबल-खुर्च्या घालून जागा अडवत असतात. कुठलेच नियम न पाळता किनारपट्टीवर अतिक्रमण करून व्यवसाय चालवतात. पोलीस, जिल्हा प्रशासन, पर्यटन खाते यांचे लक्ष नसल्यामुळे शॅक मालकांनी किनारे गिळंकृत केले आहेत. हरमल, मोरजी या किनाऱ्यांवरच नव्हे तर कुठल्याही किनाऱ्यावर शॅक मालकांनी केलेले अतिक्रमण हे कुठल्याच नियमांना धरून नसते. कळंगुट, वागातोर, बागा, हणजूण सारख्या भागातही हीच स्थिती आहे. त्यांना संरक्षण देणारे लोक तयार झाल्यामुळे किनाऱ्यांची आज दुरवस्था झाली आहे. ग्रामसभेत आवाज उठवला तर पोलिसांसमक्ष कशा पद्धतीने लोकांना मारहाण केली जाते, याचे उदाहरण हणजूण ग्रामसभेत सर्वांनीच पाहिले. प्रत्येक ठिकाणी मंत्री, आमदारांच्या आशीर्वादानेच शॅक, रेस्टॉरंट, पबवाल्यांची दादागिरी सुरू आहे. यातूनच पर्यटकांची लुबाडणूक, फसवणूक आणि त्यांना मारहाण आणि शेवटी खुनापर्यंत गुन्हे करण्याचे प्रकार घडत आहेत. राज्य सरकारला आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व खात्यांना, इतर संबंधित घटकांना जे घडत आहे ते गंभीर आहे असे दिसत नसेल तर यापेक्षा दुर्दैव नसावे. सोशल मीडियाचा काळ आहे. त्यामुळे पर्यटकांना येणारे वाईट अनुभव लोक सोशल मीडियाद्वारे जाहीरपणे सांगत आहेत. त्यातच टूलकिटद्वारे गोव्याच्या पर्यटनाची बदनामी सुरू झाली. सर्व बाजूंनी गोव्यावर हल्लाबोल होत असतानाही गोव्यातील पर्यटन सुरक्षित आहे, हे सांगण्यास राज्य सरकार कमी पडत आहे.

गोव्याला देशी आणि विदेशी असे दोन्ही पर्यटक हवेत. फक्त विदेशी पर्यटकांवरच गोव्याचे पर्यटन उभे आहे, असे म्हणणाऱ्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे लागेल. गोव्याला सर्व प्रकारचे पर्यटक हवेत. त्यात चांगले पर्यटक गोव्यात येतील आणि गोवा त्यांना सुरक्षित वाटेल अशा गोष्टी करण्याची गरज आहे. फक्त विदेशात रोड शो करूनच पर्यटक येतील, असे समजू नये. देशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही गोव्याच्या पर्यटनाचे प्रमोशन योग्य पद्धतीने व्हायला हवे. त्यासाठी गोव्यातील समुद्र किनारे आणि एकूणच पर्यटन क्षेत्र पर्यटकांना सुरक्षित आहे, याची हमी देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. समुद्र किनाऱ्यांवरील व्यवसायांवर खासगी गुंडांचे नियंत्रण न येता त्यावर सरकारचे नियंत्रण असावे. आतापर्यंत चार महिन्यांत दोन खून झाले. चार जणांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. या सगळ्या गोष्टी पाहता गोवा पोलीस, गोवा पर्यटन खाते यांनी संयुक्तपणे काही उपाय आखण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा खुनासारखे गुन्हे घडत आहेत त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खरोखरच सजग आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.