दिलासा ! एचआयव्हीबाधित तरुणांच्या संख्येत घट

२०२४ ची आकडेवारी : यंदा राज्यातील एकूण बाधित २४६


18th January, 12:15 am
दिलासा ! एचआयव्हीबाधित तरुणांच्या संख्येत घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २००९ ते २०२२ दरम्यान एकूण एचआयव्हीबाधितांपैकी सर्वाधिक बाधित हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते. २०२३ मध्ये म्हणजे १४ वर्षांत प्रथमच सर्वाधिक बाधित हे तरुण म्हणजेच २५ ते ३४ वर्षे वयोगटातील आढळले होते. गोवा एड्स नियंत्रण संस्था, आरोग्य खाते व अन्य संस्थांनी केलेल्या जागृती उपक्रमांमुळे २०२४ मध्ये या वयोगटातील तरुण बाधितांची संख्या पुन्हा कमी म्हणजे ७६ झाली आहे. राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून ही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये एकूण २६० एचआयव्ही बाधित आढळले होते. यांतील सर्वाधिक ९७ बाधित (३७.३ टक्के) हे २५ ते ३४ वर्षे वयोगटातील होते. २०२४ मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या ६.४ टक्क्यांनीने घटली आहे. २०२४ मध्ये एकूण २४६ एचआयव्हीबाधित आढळले होते. यात २५ ते ३४ वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या ही ७६ (३०.९ टक्के) होती. तर २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ३५ ते ४९ व ५० वर्षांवरील बाधितांची संख्या किंचित वाढली आहे.
२०२३ मध्ये ८५ बाधित (३२.७ टक्के) हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते. २०२४ मध्ये एकूण बाधितांपैकी सर्वाधिक ८३ बाधित (३३.७ टक्के) हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ५० वर्षांहून अधिक असणाऱ्या बाधितांची संख्या ६.७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३ मध्ये एकूण बाधितांपैकी ४४ बाधित (१६.९ टक्के) हे ५० वर्षांहून अधिक वयाचे होते. २०२४ मध्ये या वयोगटातील ५८ (२३.६ टक्के) बाधित आढळले.
असुरक्षित लैंगिक संबंध प्रमुख कारण
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०२४ मध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण हे ९७.२ टक्के होते. पालकांमुळे बाळाला बाधा होण्याचे प्रमाण २.८ टक्के इतके होते.
बार्देश तालुक्यात सर्वाधिक बाधित
राज्यात २०२४ मधील एकूण बाधितांपैकी सर्वाधिक ४८ बाधित (१९.५ टक्के) हे बार्देश तालुक्यातील होते. यानंतर मुरगाव ३३ (१३.४ टक्के) , सासष्टी ३१ (१२.६ टक्के), तिसवाडी २९ (११.७ टक्के) बाधित आढळले होते. २०२४ मध्ये काणकोण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आढळला होता.