युवतीचा विनयभंग; उसगावचे सचिव निलंबित

पंचायत खात्याकडून कारवाई


17th January, 11:56 pm
युवतीचा विनयभंग; उसगावचे सचिव निलंबित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : युवतीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पंचायत खात्याने उसगाव-गांजेचे पंचायत सचिव होनाजी अनिल मोरजकर यांचे शुक्रवारी निलंबन केले. पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
होनाजी मोरजकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पीडित युवतीने काही दिवसांपूर्वी पंचायत संचालक, फोंडा गटविकास अधिकारी व फोंडा पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी फोंडा पोलिसांनी पंचायत सचिव होनाजी मोरजकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता.
होनाजी मोरजकर आपल्याला वारंवार आपल्याच कार्यालयात बसवून ठेवत होते. मोबाईलद्वारे अश्लील संदेश पाठवत होते. एके दिवशी पंचायत संचालकांना भेटण्यासाठी ते आपल्याला पणजीला घेऊन गेले. परंतु, पंचायत संचालक म्हणून एका पुरुष अधिकाऱ्याची भेट घडवून दिली. पणजीतून परतत असताना त्यांनी आपला विनयभंग केल्याचे पंचायतीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या युवतीने तक्रारीत म्हटले होते. आपल्याप्रमाणेच मोरजकर यांनी इतर युवतींना फसवू नये, या उद्देशाने आपण पोलीस तक्रार केल्याचेही तिने स्पष्ट केले होते. या प्रकरणानंतर विरोधी काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत, सचिवावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पंचायत खात्याकडून गंभीर दखल
या प्रकरणाची पंचायत खात्याने गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी होनाजी मोरजकर यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर पंचायत संचालक हळर्णकर यांनी मोरजकर यांना निलंबित केल्याचा आदेश जारी केला.