‘आझाद’ -‘इमर्जन्सी’मध्ये बाॅक्सऑफिसवर होणार टक्कर
या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि चित्रपटगृहांमध्ये नवीन मनोरंजनाचा बार उडणार आहे! कारण पाताललोक २, द रोशन्स सारख्या मालिका आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून चित्रपटगृहात अजय देवगणचा भाचा अमन देवगण याचा ‘आझाद’ आणि कंगणा राणौतच्या ‘इमर्जन्सी’ची थेट टक्कर होत आहे.
आझाद । थिएटर्स
आझादचा टीझर ५ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. टीजर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या केंद्रभागी आझाद नावाचा घोडा आहे. टीझरच्या सुरुवातीला हल्दीघाटीच्या युद्धाचा उल्लेख आहे. यामुळे महाराणा प्रताप यांच्या चेतक या निष्ठावान घोड्याची छ्बी प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आपसूकच तरळते. टीजर आणि ट्रेलरमधील संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्स देखील भन्नाट दिसत आहेत. एकंदरीत चित्रपटाच्या कथेत किती दम आहे हे चित्रपटगृहात गेल्यानंतरच कळेल. या चित्रपटात अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगण, रविना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक कपूरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
इमर्जन्सी । थिएटर्स
कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बऱ्याच काळानंतर प्रदर्शित होत आहे. १९७५ साली देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. तत्कालीन राजकीय परिस्थिती, पडद्यामागच्या घडामोडी हे या चित्रपटाचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत. कंगना नेहमीच दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते. आणि एकंदरीत टीजर व ट्रेलर पाहिल्यास इंदिरा गांधीची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने केलेल्या प्रयत्नांची व घेतलेल्या मेहनतीची जाण होते. चित्रपटात मिलिंद सोमण यांनी फील्डमार्शल सॅम माणेकशॉ यांची दमदार भूमिका साकारली आहे. यात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, माहिमा चौधरी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
विदुथलाई भाग २ । झी ५
विजय सेतुपतीच्या अॅक्टिंग मास्टरक्लासने सजलेल्या या चित्रपटाची कथा एका शाळा शिक्षकाच्या अवतीभवती फिरते. हा एक तमिळ थ्रिलर असून यात सूरी, मंजू वॉरियर आणि अनुराग कश्यप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय आणि अनुरागची जुगलबंदी आपण महाराजा या चित्रपटात नक्कीच पाहिली असेल. या चित्रपटात देखील त्यांची केमिस्ट्री जुळल्याचे टीजर आणि ट्रेलरमधून दिसून आले आहे. विजयने साकारलेला हा शिक्षक अन्यायाविरुद्ध उभा ठाकला असून, त्याला येणाऱ्या अडचणींचा सामना करत तो यातून कसा बाहेर पडतो हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पहा.
पॉवर ऑफ पांच । डिझ्ने+हॉटस्टार
ही नवीन वेब सिरिज असून, या मालिकेच्या केंद्रभागी बेला नावाची एक मुलगी आणि तिचे ४ खोडकर मित्र आहेत. एक दिवस या मुलांना एक विलक्षण आणि अलौकिक शक्ती प्राप्त होते. यांतर त्यांच्या जीवनात थ्रिल आणि अनेक आव्हाने येतात. पाचही जण मिळून सर्व अडचणींना कोणत्या प्रकारे मात देतात हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. बच्चे कंपनीसाठी ही मालिका म्हणजे मेजवानीच ठरणार आहे.
पाताल लोक सीझन २ । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
पाताल लोकच्या पहिल्या सीजनने तूफान लोकप्रियता मिळवली. अभिषेक बॅनर्जीने साकारलेला हतोडा त्यागी आजही काळजात धडकी भरवतो. तीन वर्षांच्या गॅप नंतर या लोकप्रिय गुन्हेगारी थ्रिलर मालिकेचा दूसरा सीजन दाखल झाला आहे. या सीजनमध्ये इन्स्पेक्टर हाथीराम चौधरींसमोर असलेल्या अडचणींत अजून भर पडलेली दिसत आहे. जयदीप अहलावत ने साकारलेला हाथीराम हा वैयक्तिक आयुष्यातील अडचणींना तोंड देताच नागालँडमधील ड्रग्स सिंडीकेटशी कसे दोन हात करतो हे पाहणे देखील मजेशीर ठरणार आहे. जयदीप अहलावतची अॅक्टिंग मास्टरक्लास ही वाखाणण्याजोगी आहे. या मालिकेत जयदीप अहलावत, तिलोत्तमा शोम, इश्वाक सिंह आणि गुल पनाग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
द रोशन्स । नेटफ्लिक्स
ही रोचक डॉक्युमेंटरी बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय कुटुंबांपैकी एक असलेल्या रोशन कुटुंबाच्या वारशाचा शोध घेते. यात ऋतिक रोशन, राकेश रोशन, राजेश रोशन आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. रोशन कुटुंबाचा बॉलीवूडमधील प्रवास यामध्ये आपल्याला पहायला मिळतो.
बॅक इन अॅक्शन । नेटफ्लिक्स
बॅक इन अॅक्शन हा एक हायफाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो दोन निवृत्त सीआयए एजंट्सची कथा सांगतो. जे एका अनपेक्षित अपघातामुळे पुन्हा गुप्तहेर जगात परततात. कॅमेरॉन डियाझ आणि जेमी फॉक्स स्टारर हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.