अकरावीत नापास झालेले १५७ विद्यार्थीही देणार थेट बारावीच्या बोर्डाची परीक्षा
पणजी : यंदा १० फेब्रुवारी पासून बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांची उजळणी शेवटच्या टप्प्यात आली असून शिक्षक-पाल्य-पालकांची कसोटीच सध्या जणू सुरू आहे. यंदा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तब्बल १७,७५१ विद्यार्थी बसणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात २४० विद्यार्थ्याची भर पडली आहे. यात ८४९८ मुलगे तर ९२५३ मुलींचा समावेश आहे. याच प्रमाणे यंदा इयत्ता अकरावीत नापास झालेले तब्बल १५७ विद्यार्थी थेट बारावीची परीक्षा देतील.
दरवर्षी १० ते १२ विद्यार्थी थेट बारावीची परीक्षा देतात. यंदा त्यात लक्षणीय वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सदर माहिती दिली. दरम्यान यंदा आयटीआय झालेले ५० विद्यार्थी देखील परीक्षा देणार आहेत मात्र हा आकडा नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येसह गणला जाणार नाही असेही ते म्हणाले.
सर्व विषयांसह (रीपीटर) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा हा ३६ आहे. यात २० विद्यार्थी तर १६ या विद्यार्थिनी आहेत. काहीच विषय घेऊन पुन्हा परीक्षा देणाऱ्यांचा आकडा हा ८२८ आहे. यात ४५४ विद्यार्थी तर ३७४ विद्यार्थिनी आहेत. निकालात सुधारणा व्हावी म्हणून पुन्हा परीक्षा देणारे १७ विद्यार्थी आहेत. यात ११ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनी आहेत.