‘संजीवनी’च्या १६९ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव

सरकार लवकरच घेणार निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 12:17 am
‘संजीवनी’च्या १६९ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव

पणजी : संजीवनी साखर कारखान्यातील ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा १६९ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने कामावर ठेवण्याबाबतचा प्रस्ताव कृषी खात्याने सरकारला सादर केला आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा १६९ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेण्याची अट ठेवलेली होती. परंतु, कर्मचारी व्हीआरएस घेण्यास तयार नाहीत. सरकारने आपली व्यवस्था इतर खात्यांमध्ये करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. कृषी खात्याने या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याची मुदत सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत दिली होती. त्यानंतर या मुदतीत डिसेंबर अखेरपर्यंत वाढ करण्यात आली. आता त्यांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव खात्याने सरकारला सादर केला असून, सरकार त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून हे १६९ कर्मचारी संजीवनी कारखान्यात काम करत आहेत. सरकारकडून त्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही कर्मचाऱ्यांनी वयाची मर्यादा ओलांडल्याने त्यांना इतर ठिकाणी काम मिळणे कठीण बनणार आहे. त्यावर सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळून ती पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा