कुचेलीतील सरकारी जमिनीतील तिन्ही घरे जमीनदोस्त

सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळल्यानंतर एनजीपीडीएची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 12:12 am
कुचेलीतील सरकारी जमिनीतील तिन्ही घरे जमीनदोस्त

म्हापसा : खडपावाडा-कुचेली, म्हापसा येथे सरकारने सर्वधर्मिय स्मशानभूमीसाठी संपादीत केलेल्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधलेली उर्वरित तिन्ही घरे उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाकडून पाडण्यात आली.

उच्च न्यायालयाने संबंधितांना स्वत:हून घरे पाडण्याचे निर्देश दिले होते. तरीही सिखा झा, गिरीश नायक व तुळशीराम मुन्नीलाल लोदी या तिघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, संबंधितांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही व त्यांची याचिका गुरूवार, दि. ९ जानेवारी रोजी फेटाळण्यात आली. ही याचिका फेटाळल्यानंतर उत्तर गोवा प्राधिकरणाने संबंधितांना घर खाली करण्यास गुरुवारपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार, या घर मालकांनी घरातील सर्व वस्तू इतरत्र हलविल्या. शुक्रवार, दि. १० रोजी सकाळी ही घरे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. यावेळी मामलेदार अनंत मळीक, एनजीपीडीएचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, २ जानेवारी रोजी राजेश झा यांचे घर जमीनदोस्त केले होते. त्यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी ३६ पैकी ३२ बेकायदा घरे पाडली होती.

म्हापसा शहर पीटी शीट क्रमांक १, चलता क्रमांक १०/३ व पीटी शीट क्रमांक २, चलता क्रमांक ११/१ या जमिनीतील सुमारे ३० हजार चौ. मी. जागेवर अतिक्रमण करून एकूण ३६ घरे बेकायदा पद्धतीने बांधली होती. ही जमीन सरकारने सर्वधर्मिय स्मशानभूमीसाठी संपादीत केली होती.

फसवणूक प्रकरणी तिघांना केली होती अटक

दरम्यान, या सरकारी जमिनीचे भूखंड पाडून संबंधित घरमालकांसह सरकारची फसवणूक करून एकूण ३८.४९ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याखाली पोलिसांनी रमेश राव, शकिल शेख व रवी चव्हाण या तिघांना अटक केली होती. 

हेही वाचा