भाड्याने दिलेल्या चार दुचाकी म्हापसा वाहतूक पोलिसांकडून जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 11:16 pm
भाड्याने दिलेल्या चार दुचाकी म्हापसा वाहतूक पोलिसांकडून जप्त

म्हापसा : पर्यटकांना बेकायदेशीरपणे भाड्याने दिलेल्या चार खासगी स्कुटर म्हापसा वाहतूक पोलिसांनी जप्त केल्या. या वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित अहवाल वाहतूक पोलिसांनी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात सादर केला आहे. तसेच या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची विनंती पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे.

पर्रा-कळंगुट व वेर्ला-हणजूण रस्त्यावर मंगळवारी सकाळी ही कारवाई पोलिसांनी केली. वाहन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी वरील ठिकाणी वाहतूक पोलीस सेवा बजावत होते. त्यावेळी जीए ०८ एयू ८५१५, जीए ०३ एजी २१४६, जीए ०३ एई ०५८८ व जीए ०३ एएस ५७१२ या क्रमांकाच्या चार दुचाकी पर्यटक दुचाकीस्वार चालवत असल्याचे आढळून आले. या सर्व पर्यटकांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी दुचाकी भाडेपट्टीवर घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या.

वाहतूक पोलीस निरीक्षक मार्लन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळंगुटकर, सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा गोसावी, ज्ञानेश्वर सावंत, विकास मापारी, हवालदार गणेश गावकर व कॉ. सज्जन परब आणि पांडुरंग गावस या पथकाने ही कामगिरी केली. 

हेही वाचा