डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे मृत्यू
साखळी : न्हावेली साखळी येथे ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सुर्ला साखळी येथील महिला जागीच ठार झाली. न्हावेलीतील रस्ते सध्या विजेच्या भूमिगत केबल्स घालण्यासाठी खोदण्याचे काम सुरू आहे. याच धोकादायक बनलेल्या रस्त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती न्हावेलीतील स्थानिकांनी दिली.
जीए ०४ टी ०६१२ हा ट्रक न्हावेली येथून सुर्लाच्या दिशेने जात होता. तर जीए ०४ पी ९८९९ ही मोटरसायकल सुर्ला येथून न्हावेलीच्या दिशेने येत असताना समोरासमोर टक्कर होऊन सदर अपघात झाला. अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेल्या वृषाली संजय सुर्लकर या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली.
सध्या रस्त्याच्या बाजूला केबल्स घालण्यासाठी एका बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता अरूंद व धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या खोदकामासाठी अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने वीज खात्याला भूमिगत केबल्स टाकण्यासाठी परवानगी दिलेली नाही. तरीही वीज खात्याकडून रस्ता बेकायदेशीररित्या खोदण्यात आलेला आहे. ट्रक व मोटरसायकल या धोकादायक व अरूंद रस्त्यावर समोरासमोर आल्यावर मोटरसायकल चालकाचा ताबा गेला व हा अपघात घडला. अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृषाली सुर्लकर या रस्त्यावर पडल्या व त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले.
या अपघाताची सरकारने गंभीर दखल घेऊन अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी. मागील २५ दिवसांपासून हे रस्ते खोदून धोकादायक स्थितीत ठेवले आहेत. या रस्त्यामुळे हा अपघात घडला आहे, असे न्हावेली येथील विश्वंभर गावस यांनी सांगितले.