वेर्णा पोलिसांकडून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल
वास्को : आपला स्टॉक पर्यवेक्षक प्रितम हळर्णकर व त्याच्या पत्नीने संगनमताने १४ लाख रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार सांकवाळ वसाहतीतील १३ स्काय इव्हेंट अँड प्रॉडक्शन हाऊसचे मालक गिरिष पिल्ले यांनी वेर्णा पोलीस स्थानकात केली आहे. तर गिरिष पिल्ले व परशुराम दोडामणी तसेच इतर दोघांनी मला चार दिवस कोंडून ठेऊन मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार प्रितम हळर्णकर यांनी केली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दोन्ही तक्रारीची दखल घेऊन संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
गिरिष पिल्ले हे सांकवाळचे माजी सरपंच व विद्यमान पंच आहेत. या प्रकरणासंबंधी गेल्या काही दिवसांपासून परस्परविरोधात पत्रकार परिषद संबंधितांनी घेतल्या होत्या.
गिरिष पिल्ले यांच्या तक्रारीसंबंधी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले यांनी प्रितम हळर्णकर व त्याची पत्नी वैशाली यांच्या विरोधात तक्रार केली आहे. प्रितम हा १३ स्काल इव्हेंट मॅनेजमेंटचा स्टॉक पर्यवेक्षक, समन्वयक आहे. त्याने १३ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता स्काय इव्हेंट अँड प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात येऊन तेथील एका मजुराचा मोबाईल तसेच तेथील ड्रॉवरमधील एक लाख रुपये रोख चोरुन तेथील सीसीटिव्हीची नासधूस केली. तसेच त्याने व त्याच्या पत्नीने संगनमताने १४ लाख रुपयांचा गैरवापर केला आहे.
तर, प्रितम हळर्णकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. रामू व लतीफ यांनी सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील १३ स्काय इव्हेंटच्या कार्यालयात ओढत आणले. तेथे गिरिष पिल्ले व परशुराम दोडामणी होते. त्यांनी मला ९ ते १२ नोव्हेंबरपर्यंत कोडून ठेवले. ९ तारखेला पिल्ले याने मला शिवीगाळ केली. तसेच लाथ, कमरेचा पट्टा व धातूच्या रॉडने मारहाण केली. या दोन्ही तक्रारींबद्दल वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.