पणजी : १३० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मायरन रॉड्रिग्जच्या पहिल्या पत्नीला गुन्हेगारी आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाकडून तिला ५० हजारांचा वैयक्तिक बॉन्ड व तेवढ्याच किमतीचा हमीदार यासह इतर अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.
भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० आणि जीपीआयडी कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत सुनीता रॉड्रिग्जला अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधार मायरन आणि पहिली पत्नी सुनीता यांनी ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये घेतले होते. हे पैसे परत करण्याऐवजी ते वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात मायरनची पहिली पत्नी सुनिता हिचा हात असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिसांनी अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य न केल्याने तिला अटक करावी लागली.
नोव्हेंबर अखेरीस पोलिसांनी गुंतवणुकीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. मायरन रॉड्रिग्ज आणि त्याची दुसरी पत्नी दीपाली परब यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले होते. हा सर्व पैसा त्यांनी स्वतःसाठी वापरला. दरम्यान, ३८ जणांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मायरनची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्जही या प्रकरणात सामील होती. तिला गुन्हेगारी आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
दक्षिण गोवा न्यायालयाकडून ५० हजारांची वैयक्तिक बॉन्ड व तेवढ्याच किमतीचा हमीदार, वास्तव्याचा पत्ता, मोबाइल क्रमांक आणि पासपोर्ट तपास अधिकार्याकडे जमा करणे, न्यायालयाच्या आदेशाशिवाय राज्याबाहेर न जाणे, जामिनावर सुटका झाल्यानंतर ८ दिवस पोलिस ठाण्यात हजेरी लावणे अशा अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द केला जाणार आहे.