अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला

आत्मघातकी हल्ल्याने तालिबान हादरले, अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह चार अंगरक्षक जागीच ठार कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही या हल्ल्याची जबाबदारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th December, 10:39 am
अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याने तालिबान सरकार हादरले. या हल्ल्यात निर्वासित मंत्री खलील उर-रहमान हक्कानी यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.हक्कानी प्रार्थनेसाठी बाहेर जात असताना निर्वासित मंत्रालयावर हा हल्ला झाला. यामध्ये चार अंगरक्षकांचाही मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे खलील हक्कानी हे तालिबान सरकारचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका होते. सिराजुद्दीन हा तालिबानचा सर्वात प्रभावशाली नेता आणि संघटनेचा कणा मानला जातो.

तालिबानने तीन वर्षांपूर्वी काबूलमध्ये सत्ता काबिज केली होती, परंतु त्यांच्या कोणत्याही प्रमुख नेत्याला अशा प्रकारे लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि म्हटले की, खलील हक्कानी हा महान योद्धा होता, ज्याने इस्लामच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. तज्ज्ञांच्या मते हा हल्ला तालिबान्यांसाठी मोठा धक्का आहे कारण यातून सरकार विरोधातील वाढता असंतोष दिसून येतो.

कोण होता खलील हक्कानी?

खलील हक्कानी हा अफगाणिस्तानातील हक्कानी नेटवर्कच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. अमेरिकेने खलीलला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. हक्कानी नेटवर्क हा तालिबानचा दहशतवादी गट असून त्यांचे नेटवर्क अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. संयुक्त राष्ट्रानेही या संघटनेवर बंदी घातली आहे. हक्कानी नेटवर्क दहशतवादी हल्ल्यांमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांचा वापर करण्यासाठी ओळखले जाते.

हेही वाचा