विद्यार्थी, पालकांनी धरणे धरताच शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बदली

तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th December, 12:16 am
विद्यार्थी, पालकांनी धरणे धरताच शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बदली

तारीवाडा-शिरोडा येथील विद्यालयाबाहेर धरणे आंदोलनात सहभागी विद्यार्थी व पालक.

फोंडा : तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका शिक्षिका वंदना पाटील नाईक यांची शिरोडा परिसरातील एका सरकारी प्राथमिक विद्यालयात बदली करण्याचा आदेश शिक्षण खात्याने बुधवारी दिला.
तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील १८ विद्यार्थ्यांसह पालकांनी बुधवारी धरणे आंदोलन केले. नियुक्त केलेल्या शिक्षकेची बदली करण्याच्या मागणीवर पालक ठाम होते. शिक्षकेचे बदली जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यालयात पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला होता. शिक्षिका वंदना पाटील नाईक यांनी आपण विद्यालयात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पालकानी आपली मानसिक सतावणूक केल्याची तक्रार शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र बुधवारी शिक्षण खात्याने त्यांची बदली करण्याचा आदेश दिला.
विद्यालयात सप्टेंबर महिन्यापासून नियुक्त केलेल्या शिक्षिका पाटील नाईक मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देत नसल्याने पालकांनी यापूर्वी विविध खात्याकडे त्यांच्या बदलीच्या मागणीची निवेदने दिली होती. शिक्षकेची बदली केली नसल्याने मंगळवारी पालकांनी मुलांना विद्यालयात पाठविले नव्हते. तसेच पालकांनी फोंडा भाग शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकेची बदली करण्याचे पुन्हा निवेदन दिले. दरम्यान, बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांसह पालकांनी विद्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. शिक्षण खात्याचे अधिकारी जोपर्यंत शिक्षकेची बदलीचा आदेश जाहीर करीत नाही, तो पर्यंत विद्यार्थ्यांना विद्यालयात पाठविणार नसल्याचा इशारा दिला.
सुदाम नाईक या पालकाने सांगितले की, शिक्षिका वंदना नाईक पाटील विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत. राजकीय दबावाने त्यांनी विद्यालयात स्वतःची नियुक्ती करून घेतली. पहिल्या दिवसापासून मुले आपल्या पालकांकडे शिक्षकेबाबत तक्रारी करीत आहेत. त्यामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात आले होते. यासंबधी शिक्षण खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
लक्ष्मण तारी यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, म्हणून पालकांनी शिक्षिकेची बदली होई पर्यंत मुलांना घरी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
शिक्षिका वंदना पाटील नाईक म्हणाल्या की, पहिल्या दिवसापासून पालकांनी आपली मानसिक सातवणूक सुरू केली. रोज सकाळी मुलांना घेऊन येणारे पालक आपल्याला टोमणे मारीत. पालकांच्या वागणुकीबद्दल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आपण गेली २३ वर्षे नोकरी करीत असून या विद्यालयात दाखल झाल्यापासून कोणतेच कारण नसताना पालक विद्यालयात येऊ नका, अशा धमक्या देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. उदय गावकर यांनी सांगितले की, पालकांच्या तक्रारीनंतर दोन वेळा अधिकाऱ्यांना विद्यालयात पाठविण्यात आले. पण दोन्ही वेळा विद्यार्थ्यांकडून शिक्षिका वंदना पाटील नाईक चांगले शिक्षण देत असल्याचे सांगण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
२३ वर्षांत एकही तक्रार नाही
शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर खात्याचे वरिष्ठ अधिकारी विद्यालयात आले होते. त्या दिवशी शिक्षिका वंदना पाटील नाईक या सुट्टीवर असल्याने पालकांना विद्यालयात बोलविण्यात आले होते. पण एकही पालक विद्यालयात त्या दिवशी उपस्थित नव्हते. गेली २३ वर्षे शिक्षिका असलेल्या वंदना पाटील नाईक यांनी अनेक विद्यालयात शिक्षण दिले. पण एकाही विद्यालयातील पालकांनी त्यांच्या विरोधात कधीच तक्रार केलेली नाही. मात्र तारीवाडा येथील विद्यालयात बदली झाल्यानंतर त्या शिक्षकेबद्दल तक्रारी का झाल्या, याबाबत सरकारी अधिकारी संभ्रमात सापडले आहेत.