अध्यक्ष रंजिता पै : २३७ प्रकरणे प्रलंबित
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महिला आयोगाने गेल्या २० महिन्यांत महिन्याला सरासरी १५ प्रकरणे निकाली लावली आहेत. एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२४ या काळात आयोगाला एकूण ३१६ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. यादरम्यान आयोगापुढे एकूण ६४९ सुनावण्या झाल्या. सध्या २३७ प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै यांनी दिली.
पै यांनी सांगितले की, आपण पदाचा ताबा घेतला तेव्हा आयोगाकडे एकूण ३२२ प्रकरणे प्रलंबित होती. गेल्या काही महिन्यांत त्यात २३१ प्रकरणांची भर पडली. आम्ही ही प्रकरणे जलद गतीने सोडवण्यासाठी निर्णय घेतला. यानुसार आठवड्यात जास्तीत जास्त सुनावण्या घेण्यात येत आहेत. गेल्या वीस महिन्यांत आयोगाने ३१६ प्रकरणे निकाली लावली आहेत. तर सध्या एकूण २३७ प्रकरणे प्रलंबित आहेत.
आयोगातर्फे महिलांच्या जागृतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यानुसार महाविद्यालय स्वयंसाहाय्यता गटांमध्ये २५ हून अधिक कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये आपल्या आधिकारांबाबत जाणीव झाली आहे. यामुळेदेखील आयोगाकडे येणाऱ्या प्रकरणांत वाढ झाली आहे. सध्या आयोगाकडे येणारी बहुतेक प्रकरणे ही घरगुती हिंसाचाराची असतात. याशिवाय लैंगिक किंवा मानसिक छळवणूक, महिला आहे म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक, लिंगभेद, अशा प्रकरणांचादेखील समावेश आहे.
सध्या सायबर गुन्हे करून महिलांची फसवणूक होत आहे. यासाठीदेखील आयोगातर्फे कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. यानुसार एकूण ४० कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १,३६४ महिलांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ३,०१२ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेतून इंटरनेट किंवा समाजमाध्यमे वापरताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती आम्ही महिला, विद्यार्थिनींना देत असल्याचे रंजीता पै यांनी सांगितले.