वाहतूक पोलिसांनी फक्त रोज वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा चालक परवाना नसताना वाहने भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. गोवा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम व्हायला हवे.
पोलीस उपमहानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांनी १४ जुलै २०२२ रोजी निर्देश जारी करून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत असेल तरच वाहन थांबवा, असे पोलिसांना सांगितले होते. त्याच वर्षी गोव्यात वाहतूक पोलिसांकडून गोव्याबाहेरील वाहन क्रमांक दिसले की अडवून सतावणूक केली जाते, अशा बातम्या यायच्या आणि अनेक पर्यटकांनी व्हिडिओंद्वारे समाज माध्यमांवर पोलिसांची आणि गोव्याची बदनामीही केली होती. ही बदनामी होऊ नये यासाठी समोर येणाऱ्या वाहनात जर वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे असे दिसते अर्थात सिटबेल्ट न वापरणे, अमर्याद वेगाने वाहन चालवणे किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवणे असे काही दृष्टीस पडल्यासच वाहन थांबवा असा त्याचा अर्थ होता. त्या निर्देशांची तीन चार दिवस चर्चा झाली. आयजीपींनी चांगले आदेश दिले असे म्हणत पोलीस खात्याच्या निर्णयांचे स्वागतही झाले. आश्चर्य म्हणजे ही नवलाई फार दिवस चालली नाही. पोलिसांना आयजीपींच्या आदेशाचा लगेच विसर पडला, कारण अर्थकारण फार महत्त्वाचे असते. पोलिसांनी पुन्हा पर्यटकांची वाहने अडवून त्यांचे दस्तावेज तपासणे, चलन देणे असे प्रकार सुरू केले. किनारी भागात तर पोलिसांकडून हटकून पर्यटकांचीच वाहने अडवली जातात. पर्यटक रेंट अ कॅब, रेंट अ बाईक घेऊन फिरतात. त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो किंवा पावती न देता विषय 'मिटवला' जातो. या मिटवण्याच्या प्रकारांची जाहीर वाच्यता होत नाही. नियमांचे पालन करण्यासाठी वाहन भाड्याने देणाऱ्याने सर्व दस्तावेज तपासूनच वाहन द्यायला हवे. पैसे मिळतात म्हणून कोणालाही वाहन देऊन ते मोकळे होतात. पोलिसांचे नेमके इथेच फावते. कुठले तरी कारण शोधून पोलीस पर्यटकांना अडवून दंडात्मक कारवाई करतात. या गोष्टींचा पर्यटकांना राग येतोच, पण वाहन भाड्याने देणाऱ्यांचाही संताप होतो. त्यामुळे अनेकदा रेंट अ कॅब आणि रेंट अ बाईक मालकांनी पोलिसांविरोधात स्थानिक आमदारांकडे तक्रारी केलेल्या आहेत. हे सगळे प्रकार पाहिले तर पोलीस अनेकदा अतिरेक करतात असेच दिसून येते. रस्त्यांच्या स्थितीमुळे वैतागलेले लोक पोलिसांच्या नावे शंख करतात. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे न पाहता फक्त चलन देतात म्हणून पर्यटकांनी कित्येकदा पोलिसांच्या कारवाईमुळे कंटाळून सोशल मीडियावर गोव्याची बदनामी केली आहे. यातून पोलिसांवर काहीवेळा कारवाई होते. पोलिसांना कोणाची सहानुभूती नसल्यामुळे त्यांचे निलंबन झाले तरीही त्यांना कोणी वाचवायला पुढे येत नाही. असाच एक प्रकार गेल्या आठ दिवसांपासून गाजत आहे. हणजूण परिसरात पोलिसांनी आपल्याशी केलेल्या गैरवर्तणुकीचे व्हिडिओ रिकॉर्डिंग करून ते पोलीस वरिष्ठांना दाखवून पर्यटकांनी तक्रार केल्यानंतर तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले. त्यांना आधी हणजूणमधून पणजीत बदलीवर पाठवले. त्यानंतर सोमवारी निलंबनाचा आदेश काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या लोकांसोबत वाहतूक पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याची चर्चा होती. गेले तीन चार दिवस या पोलिसांची चौकशी करण्यात आली. शेवटी तक्रारीतील दावा खरा निघाल्यामुळे तिघांनाही निलंबित करण्यात आले. एरवी पोलिसांना चलन देऊन दंडात्मक कारवाई करण्यासाठी वरिष्ठांचेच आदेश असतात. त्यासाठी दर शनिवारी वसुलीचे 'टार्गेट' दिलेले असते. हे काम करताना वाहन चालकांची पोलिसांकडून जी सतावणूक होते, त्याकडे दुर्लक्ष होते. यावेळी तक्रारदार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे ओळखीचे निघाल्यामुळे ही कारवाई झाली आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून सतावणूक होते, यात नवे काही नाही.
वाहतूक पोलिसांनी फक्त रोज वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा चालक परवाना नसताना वाहने भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. गोवा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम व्हायला हवे. गोव्यातील चेकपोस्टवर तर गोव्यात प्रवेश करणाऱ्या परराज्यातील वाहनांना लक्ष्य करून त्यांच्याकडील दस्तावेजांची तपासणी केली जाते. तिथेही सबबी देत वसुली होत असते. तीच वाहने पुढे गोव्यात फिरताना आढळली तर पुन्हा पोलीस त्यांना अडवतात. पर्यटकांचे एक वाहन गोव्यात तीन चार दिवस राहिले तर तीन चार वेळा त्यांना पोलिसांचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या या छळामुळे पर्यटक कंटाळतात आणि त्यातून नंतर गोव्याची बदनामी करतात. गोव्यात आलेले वाहन पोलिसांनी चेकपोस्टवर तपासूनच पुढे पाठवले आहे, अशी लेखी साधी पावती वाहनांना दिली जावी. त्यानंतर त्या वाहनाच्या कागदपत्रांची गोव्यात तपासणीच्या नावाखाली सतावणूक होऊ नये. पर्यटकांचे चांगले स्वागत झाले तरच गोव्याची बदनामी थांबणार आहे.