पणजीतील समस्यांची समस्या

पणजीतील वाहतूक सुरळीत करायची असेल तर पोलिसांनी कडक धोरण स्वीकारायला हवे. तसेच एक वाहन चालक म्हणून सर्वांनी आपली जबाबदारी समजून वाहने चालवल्यास पणजीतील वाहतूक कोंडी निदान काही प्रमाणात कमी होईल.

Story: कॉलिंग अटेंशन |
08th December, 03:43 am
पणजीतील  समस्यांची समस्या

गेल्या काही वर्षात राजधानी पणजीत अनेक चांगले बदल झाले. बदलत जाणाऱ्या पणजीतील तसे प्रश्न किंवा समस्या देखील बदलल्या. असे असले तरी राजधानी पणजीमध्ये काही समस्या कायम स्वरूपाच्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प नेमका कधी संपणार? मांडवीतून कॅसिनो हटणार की नाही? करोडो रुपये खर्च करून देखील पावसात पणजी का बुडते? शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त कधी येणार? वाहतूक कोंडी कधी थांबणार? असे काही प्रश्न सामान्य पणजीकरांना पडले आहेत. 

सध्या वाहतूक कोंडीवर विचार करूयात. राजधानीचे शहर असल्याने पणजीत अनेक सरकारी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये किंवा कार्यालये येथे आहेत. यामुळे साहजिकच पणजीत स्थानिकांची नेहमीच वर्दळ असते. विशेष करून कार्यालये भरताना, सुटताना सकाळी आणि संध्याकाळी गर्दी जास्त असते. त्याशिवाय येथे पर्यटकांची संख्या देखील जास्त आहे. रात्रीच्या वेळी कॅसिनोला देखील गर्दी असते. कुणीही कितीही आव आणला, वाहतूक सुरळीत आहे असा दावा केला किंवा ही गोष्ट अमान्य केली तरीही बहुतेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही असतेच. 

पणजीतील वाहतूक कोंडीची विविध कारणे आहेत. यात बेशिस्त पद्धतीने केलेले पार्किंग, लेन जम्पिंग करून ओव्हरटेक करणे, वाहतूक पोलिसांचा अभाव, पोलीस असले तरी वाहतूक नियंत्रण करण्यापेक्षा दुचाकींना चलन देण्यातच धन्यता मानणे, रस्त्यावर मधेच वाहने थांबवणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कमतरतेमुळे खाजगी वाहनांची वाढत चाललेली संख्या, बस थांबा नसतानाही बस थांबवणे, रस्त्यावर सुरू असलेली कामे, रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते, रस्ता ही माझी खाजगी मालमत्ता आहे अशी मानसिकता असणे अशी अनेक कारणे आहेत. 

दिवजा सर्कल ते मिरामार सर्कल हा पणजीतील महत्त्वाचा रस्ता. पणजी शहरात प्रवेश करण्याचा हा एक मुख्य रस्ता. या रस्त्यावर पाटो पुलाजवळ, कॅसिनोसमोर, मासळी बाजार, ईएसजी, बालभवन, मिरामार सर्कल येथे हमखास वाहतूक कोंडी असते. पाटो पुलावरील लोखंडी पट्टी वारंवार खराब होते. यामुळे येथे वाहने अती सावकाश चालवावी लागतात. यामुळे कदंब बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. प्रशासनातर्फे येथे दुरुस्ती करण्यात येत असली तरी कायमस्वरुपी उपाय केल्यास या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल.

मासळी बाजार, ईएसजी समोर नो पार्कींग असतानाही मुख्य रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. बस देखील थांब्यावर सोडून अन्यत्र थांबवल्या जातात. यामुळे येथे वाहतूक कोंडीत भर पडते. येथे वाहतूक पोलिसांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे. अशा रीतीने पार्क केलेली वाहने वाहतूक खात्याने लगेच उचलली पाहिजेत. १८ जून रस्त्यावर देखील हीच समस्या आहे. 

येथे पे पार्किंग असले तरी त्याच्या मागे पुन्हा वाहने पार्क केली जातात. अशा डबल पार्किंगमुळे आधीच लहान असलेला हा रस्ता अधिकच अरुंद होतो. पणजी बाजार परिसर, आत्माराम बोरकर रस्ता येथेही अशीच स्थिती आहे. 

पणजीतील वाहतूक सुरळीत करायची असेल तर पोलिसांनी कडक धोरण स्वीकारायला हवे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड झाला पाहिजे. राजकारण्यांनी, त्यांच्या पंटरनी दंड झालेल्या व्यक्तीचा दंड माफ करा असे पोलिसांना सांगणे आधी बंद केले पाहिजे. केवळ पोलिसांना दोष देता कामा नये. चारचाकी चालकांना वाहनाची पार्किंग लाईट लावली की वाहन कुठेही पार्क केले तर चालते हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. दुचाकी चालकांनी रस्ते म्हणजे वेगात चालवण्यासाठी बनवलेले रेस ट्रॅक नाहीत हे लक्षात घ्यावे. एक वाहन चालक म्हणून सर्वांनी आपली जबाबदारी समजून वाहने चालवल्यास पणजीतील वाहतूक कोंडी निदान काही प्रमाणात कमी होईल.

पिनाक कल्लोळी
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)