बंडखोरांच्या हल्ल्यात सुमारे १०० लोक मारले गेल्याची प्राथमिक माहिती
अलेप्पो : मध्यपूर्व आशिया गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आराजकतेच्या आगीत होरपळत आहे. आधी आयसिस आणि आता बंडखोर अतिरेक्यांनी सिरियातील लोकांना जेरीस आणले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सीरियामध्ये बंडखोर गटांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी बंडखोरांनी अलेप्पोला लक्ष्य केले आहे.
अशा स्थितीत हल्ले वेळीच थोपवले नाहीत तर सिरियाचे सत्ताकेंद्र असलेले अलेप्पोसारखे मोठे शहर हयात तहरीर-अल-शामच्या नेतृत्वाखालील बंडखोर दहशतवादी गटांच्या हाती अनायासे पडण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात सीरियाची राजवट कमकुवत झाली असून इराणची कमकुवत होत असलेली पकड हे त्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले जात आहे. सीरियातील हा हल्ला गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठा हल्ला आहे.
बंडखोर दहशतवादी गट हयात तहरीर अल-शाम म्हणजेच एचटीएस पुन्हा एकदा सीरियामध्ये आपली गेल्या काही वर्षांत डळमळीत झालेली पकड मजबूत करत आहे. या गटाने सीरियाच्या सैन्याला हुसकावून लावत अलेप्पोमध्ये प्रवेश केला आहे, अशा परिस्थितीत इराण, रशिया आणि हिजबुल्लाहच्या मदतीशिवाय एचटीएसचा सामना करणे सीरियन सरकारसाठी कठीण आहे. अशा स्थितीत सीरियन लष्कराने या गटाला कठोरपणे तोंड दिले नाही, तर आगामी काळात ते सीरियातील आणखी अनेक शहरे खालसा करू शकतात. विशेष म्हणजे या बंडखोरांना मोसादचा छुपा वरदहस्त लाभला आहे.