पालिका मंडळ ॲक्शन मोडवर : वसुलीसाठी विशेष पथकाची नियुक्ती
डिचोली पालिकेच्या बैठकीत चर्चा करताना नगराध्यक्ष कुंदन फळारी. सोबत सर्व नगरसेवक व अधिकारी वर्ग.
डिचोली : डिचोली पालिका क्षेत्रात सरकारी आस्थापनांचे थकलेले भाडे, गाळे, घरपट्टी व इतर मिळून सुमारे चार कोटीहून अधिक थकबाकी वसूल करणे बाकी आहे. पालिका मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा बराच गाजला. विविध सरकारी कार्यालय तसेच घरपट्टी व इतर मिळून ही वसुली युद्धपातळीवर वसूल करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून तातडीने हालचाली करून वसुली करण्यावर भर देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपनगराध्यक्ष दीपा पळ, दीपा शिरगावकर, अनिकेत चणेकर, विजयकुमार नाटेकर, सुखदा तेली, तनुजा गावकर रियाज बेग, सतीश गावकर, गुंजन कोरगावकर, सुदन गोवेकर, नीलेश टोपले, गुंजन कोरगावकर, मुख्याधिकारी सचिन देसाई तसेच अभियंते व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
थकबाकी वसुली केल्याशिवाय आर्थिक स्थैर्य पालिकेला लाभणार नाही. त्यामुळे या विषयावर जातीने लक्ष देऊन वसुली कशाप्रकारे करणे शक्य आहे, याबाबत पालिका मंडळाच्या बैठकीत बराच वेळ चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्षांनी तसेच मुख्याधिकाऱ्यांनी सरकारी वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून गाळे तसेच घरपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. घरपट्टी ९८ लाख असून त्यासाठी विशेष मोहीम आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी वसुलीसाठी एक विशेष टीम नियुक्त करण्याचा ठराव घेण्यात आला. वेगवेगळे गाळे आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात येत आहेत.
मागील शिलकी रकमेतही आवश्यक भाडेवाढ करून त्यांना नोटीस पाठवणे, ज्यांनी थकबाकी भरलेली नाही, त्यांना नोटीस पाठवून उत्तर न आल्यास गाळे सील करणे, याबाबतही चर्चा झाली. पालिका मंडळातील सर्व प्रभागातील विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
पाईपलाईन तसेच गटार योजना व इतर कामांसाठी खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याबाबतही चर्चा झाली. नवा सोमवार उत्सव ९ डिसेंबरला असल्याने त्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करण्याबाबत एक मत झाले. यावेळी वीज, पाणी व्यवस्था, गुरांचा उपद्रव तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रात मिळालेल्या यशाबद्दल भाजपचे अभिनंदन
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित युतीला विक्रमी यश प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन बैठकीत करण्यात आले. नगरसेवक नाटेकर यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वांना मते अनुमोदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोव्याच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भूमिका पार पडली. त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.