एसबीआयच्या माजी व्यवस्थापकाकडून २.२३ कोटींची अफरातफर

गुन्हा शाखेकडून सत्र न्यायालयात आरोपपत्र

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November, 12:12 am
एसबीआयच्या माजी व्यवस्थापकाकडून २.२३ कोटींची अफरातफर

पणजी : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पणजी ट्रेझरी शाखेचे माजी व्यवस्थापक राकेश कुमार याच्या विरोधात गुन्हा शाखेने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. कुमार याने पदाचा गैरवापर करून २.२३ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) उत्तर गोवा क्षेत्रीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर ठाकरे यांनी २३ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, राकेश कुमार याची ८ मार्च २०१८ ते ६ जून २०२१ कालावधीत पणजी येथील बँकेच्या ट्रेझरी शाखेत व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. या शाखेत सरकारच्या विविध खात्यातील कर व इतर रक्कम जमा केली जात आहे. यापैकी डेबिट खाते क्र. ३०१२६४९५८३८, क्रेडिट खाते क्र. ९८५५६०८८५१० आणि क्रेडिट खाते क्र. ९८७८४०८८५१० या तीन खात्यांतील अधिकाराचा गैरवापर करून सुमारे १,८९,२०,७४६ रुपये राकेश कुमार याने आपल्या मुंबईतील आयआयएफएल सेक्युरीटी लिमिटेडच्या डिमॅट खात्यात जमा केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

या प्रकरणी गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश गावडे यांनी संशयित राकेश कुमार याच्या विरोधात भा. दं. सं.च्या कलम ४०९, ४७७ ए आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३(१)(सी)व १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. त्यानंतर निरीक्षक गावडे यांची इतर ठिकाणी बदली झाल्यानंतर वरील गुन्ह्याचा तपास निरीक्षक निनाद देऊळकर यांनी केला. याच दरम्यान संशयित राकेश कुमार याने २ कोटी २३ लाख ३२ हजार ०५५ रुपयांचा बँकेला गंडा घातल्याची समोर आले.

तपास पूर्ण करून गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊलकर यांनी राकेश कुमार याच्या विरोधात पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

बदलीनंतर अफरातफरीचा प्रकार उघड

हा प्रकार राकेश कुमार याची जून २०२१ मध्ये गोव्यातून इतर ठिकाणी बदली झाल्यानंतर समोर आले. त्याच्या जागी आलेल्या व्यवस्थापकाला वरील खात्यात काही तरी चुकीची नोंद झाल्याची शंका आली. बँकेने प्राथमिक चौकशी करून नंतर गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली. 

हेही वाचा