तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या दहा वर्षांत गोव्यातील ४.९० लाख व्यक्तींनी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२४-२५ (१ नोव्हेंबरपर्यंत) गोव्यातील लाभार्थ्यांना ४,९२० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या दहा वर्षांतील एकूण लाभार्थींपैकी ३६ टक्के म्हणजेच १.७२ लाख महिला आहेत. या कालावधीत महिलांना १,२६३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. वरील कालावधीत २०२२-२३ मध्ये सर्वाधिक २४ हजार १३१ महिलांना २०३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. वरील कालावधीत आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये सर्वात कमी म्हणजे ८६.३७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले होते. यावर्षी १६ हजार ३२७ महिलांनी याचा लाभ घेतला होता.
राज्यातील एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०२४-२५ (१ नोव्हेंबरपर्यंत) एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील ८९ हजार २७० लोकांना योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करण्यात आले आहे. एकूण लाभार्थींपैकी १८.१८ टक्के लाभार्थी हे या तीन समाजातील होते. गेल्या दहा वर्षांत या समाजातील व्यक्तींना ४७८.१६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे.
...