...आणि भाऊसाहेब बांदोडकर पहिले मुख्यमंत्री बनले

कुलदेवतेने संमती दिली तरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी स्वीकारेन हे भाऊसाहेबांनी सर्व मान्यवरांना स्पष्टपणे सांगितले. जनता जनार्दनाचा आग्रह स्वीकारून मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास देवीने कौल दिल्याचे त्यांनी देवघरातून बाहेर येऊन सांगितले. उपस्थित आमदार व इतर मगो नेत्यांनी या निर्णयाला टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. हा निर्णय व निवड झाली तेव्हा भाऊसाहेब आमदारही नव्हते.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
6 hours ago
...आणि भाऊसाहेब बांदोडकर पहिले मुख्यमंत्री बनले

१० डिसेंबर १९६३ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. कृतज्ञतेच्या भावनेने बहुसंख्य गोमंतकीय मतदारांनी काँग्रेस उमेदवारांनाच मतदान केले असणार असे सर्वच काँग्रेस उमेदवार आणि नेत्यांनाही वाटत होते. त्यामुळे खादीचे पांढरेशुभ्र कपडे घालून विजयी मुद्रेने हे नेते सकाळी सकाळीच मतमोजणी केंद्रावर दाखल झाले होते. मगो आणि युगो नेते आणि कार्यकर्तेही आपलेच उमेदवार जिंकणार या आविर्भावात वावरताना दिसत होते. मतपेट्या उघडल्या ‌तेव्हा काँग्रेसचे पानिपत झाल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट झाले. 

पहिल्या दिवशी गोव्यातील २८ पैकी १४ मत‌दारसंघांची मतमोजणी पूर्ण झाली. त्यापैकी १० जागा युगोला, तर केवळ ४ जागा मगोच्या पदरात पडल्या होत्या. दमणमधून काँग्रेसने बाजी मारली होती, तर दीवमधून अपक्ष विजयी झाला. सोळापैकी १० जागांवर युगोचा झेंडा लागल्याने युगो नेते खूश झाले. आणखी चार जागा मिळाल्यास दमण व दीव आमदारांचा पाठिंबा मिळवून डॉ. जॅक सिक्वेरा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी योजना तयार करण्यात आली. गोव्यातील ‘अजीब’ मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांबरोबरच युगो नेत्यांनाही मामा बनविले. पहिल्या दिवशी  तब्बल १० जागा मिळाल्याने सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिक्वेरा यांच्या युगो पक्षाला दुसऱ्या दिवशी १४ पैकी केवळ दोनच जागा मिळाल्या. मगोने पाठिंबा दिलेल्या प्रजा समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले. मगोचे १४ आणि प्रजा समाजवादी पक्षाचे २ मिळून १६ आमदार झाले. दीवचे अपक्ष आणि दमणचे काँग्रेस आमदार; या दोन आमदारांनी मगोला पाठिंबा दिल्याने १८ आमदारांच्या पाठिंब्यावर मगोचे सरकार बनले.

काँग्रेस पक्षाने सर्व म्हणजे ३० ही मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ दमणमधील एकच उमेदवार विजयी झाला. बाकीचे २९ उमेदवार पराभूत झाले. बरेच उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. या पराभूत उमेदवारांत महान खाणमालक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, नामांकित समाज कार्यकर्ते आदिंचा समावेश होता. यूगोने २४ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी १२ जैतिवंत झाले. ज्या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात होते, त्या मतदारसंघात युगो उमेदवारांनी आघाडी घेतली. हे सर्व आमदार जुन्या काबिजादेतील होते. मगोने २७ उमेदवार उभे केले होते, त्यांपैकी १४ निवडून आले. मगोने पाठिंबा दिलेले दोन उमेदवार निवडून आले होते. हे सर्व म्हणजे १६ ही आमदार नव्या काबिजादीतील होते. १९६३ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत सुरू झालेले १६-१२ चे हे चक्र आजही, आमदारांची संख्या ४० झालेली असतानाही चालू आहे.

१९६३ ची ही निवडणूक मुक्त गोव्यातील पहिलीच निवडणूक असली, तरी मतदार बरेच जागृत व सतर्क होते. सत्तरी व फोंडा मतदारसंघ प्रजा समाजवादी पक्षाला सोडले होते पण तांत्रिक अडचणीमुळे ‘सिंह’ हे मगोचे निवडणूक चिन्ह घेतलेले उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. मात्र मतदारांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान केले. सांत आंद्रे मतदारसंघात मगोचे उमेदवार आझाद गोमंतक दलाचे प्रमुख विश्वनाथ लवंदे अवघ्या ११२ मतांनी पराभूत झाले होते.

गोवा मुक्तीसाठी प्राण पणाला लावून सशस्त्र लढा लढलेले तसेच मुक्तीनंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे क्रांतिकारक लवंदे विधानसभा निवडणुकीत ११२ मतांनी एक बस मालक तिओतिन परेरा यांच्याकडून पराभूत झाले. यावरुन या पहिल्या निवडणुकीत कोणत्या धोरणावर मतदान झाले होते हे स्पष्ट होते. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३० उमेदवार उभे केले होते. काँग्रेस सरकारने लष्कराचा वापर करून गोवा मुक्त केल्याने गोमंकीय जनता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देतील याची पंतप्रधान पं. नेहरु यांच्यापासून गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर ‌यांच्यापर्यंत सर्वांनाच खात्री होती. मात्र पहिल्याच दिवशी कूजका नारळ निघाल्याने दिल्लीतले सर्व नेते नाराज होते. गोव्यातील निकाल ऐकून खुद्द पंतप्रधान पं. नेहरू अत्यंत नाराज बनले. “अजीब है गोवा के लोग!” असे उद्गार त्यांनी उद्वेगाने काढले. गेली ६१ वर्षे हे शब्द गाजत आहेत. 

गोवा विधानसभा निवडणुकीत नवख्या मगो पक्षाला १८ आमदारांचा पाठिंबा होता. युगोला बारा आमदारांचा पाठिंबा होता. मगो आमदारात अॅड. पां. पु. शिरोडकर हे उच्च विद्याविभूषित आमदार होते. आपण मुख्यमंत्रीपदास योग्य उमेदवार असल्याचे त्यांचे मत होते. मगो पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर या प्रश्नांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले. गोव्यात मगो पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला होता आणि मगोचा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी सल्ला-मसलत केली, हे सगळे वाचायला विचित्रच दिसते पण मगोच्या विजयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा फार मोठा वाटा होता. गोवा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी वसंतराव नाईक गोव्यात यायचे, तेव्हा त्यांचा मुक्काम भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडेच असायचा. या विषयी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार केली होती. भाऊसाहेब बांदोडकर माझे मित्र असल्याने मी त्यांच्या घरी राहतो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आणि पुरुषोत्तम काकोडकर यांचे तोंड बंद पडले. 

गोव्याचा नवा मुख्यमंत्री कुणाला करावे या विषयावर चर्चा, सल्ला-मसलत करण्यासाठी भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा “हे काय विचारणे झाले?” असा उलटा स्वर नाईक साहेबांनी भाऊसाहेबांना केला. “तुमच्यावरील‌ प्रेमापोटी मगो पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी टाळता येणार नाही.” असे वसंतरावांनी फर्मावले तेव्हा भाऊसाहेबांना धक्काच बसला. भाऊसाहेबांनी अनेक लोकांना निवडून आणले होते पण स्वत: निवडणूक आखाड्यात उतरण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची आपली मुळीच तयारी नाही असे भाऊसाहेबांनी स्पष्ट सांगितले. 

ही चर्चा चालू असतानाच बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, जयवंतराव टिळक आदी ज्येष्ठ नेते तिथे पोहचले. या सर्वांनी मिळून भाऊसाहेबांची समजूत काढली, तेव्हाच कुठे भाऊसाहेब मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. मात्र कुलदेवतेने संमती दिली तरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी स्वीकारेन हे त्यांनी सर्व मान्यवरांना स्पष्टपणे सांगितले. लोककल्याणकारी कार्य करण्यास कोणतीही देवता नाही म्हणणार नाही असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. गोव्यात पोहोचल्यावर भाऊसाहेबांनी आपले मन बदलू नये म्हणून बॅ. नाथ पै यांना गोव्यात पाठविण्यात आले.

दुसऱ्या दिवशी मगो पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्यासाठी भाऊसाहेबांच्या आल्तिनोवरील बंगल्यावर सर्व मगो आमदारांची बैठक बोलाविण्यात आली. मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. एवढ्यात बॅ. नाथ पै यांच्यासोबत भाऊसाहेबांचे बंगल्यावर आगमन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक व महाराष्ट्रातील इतर विद्वानांनी, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी स्वीकारावी असा आदेशवजा सल्ला दिला आहे असे भाऊसाहेबांनी मगो आमदार व इतर नेत्यांना सांगितले. उपस्थित सर्वांनी या सूचनेला मान्यता दर्शवली. त्यानंतर भाऊसाहेब देवघरात गेले. नेहमीप्रमाणे ध्यानस्थ बसले. जनता जनार्दनाचा आग्रह स्वीकारून मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास देवीने कौल दिल्याचे त्यांनी देवघरातून बाहेर येऊन सांगितले. 

उपस्थित आमदार व इतर मगो नेत्यांनी या निर्णयाला टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. हा निर्णय व निवड झाली तेव्हा भाऊसाहेब आमदारही नव्हते. आमदार नसलेल्या एखाद्या व्यक्तीची बहुसंख्य आमदारांनी विधिमंडळ नेता म्हणून निवड केली, तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथ देण्याची तरतूद घटनेत आहे. घटनेतील या तरतुदीनुसार २० डिसेंबर १९६३ रोजी  दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा मुक्त गोव्याचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.  वि. सू. करमली व टोनी फर्नांडिस यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला. गोवा, दमण व दीव संघप्रदेशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात केवळ तीन मंत्री होते. गोव्याचे नायब राज्यपाल मुल्कराज सचदेव यांनी या मंत्र्यांना अधिकारपद व गोपनीयतेची शपथ दिली. अशा पद्धतीने गोव्यातील पहिले लोकनियुक्त सरकार २० डिसेंबर १९६३ रोजी म्हणजे गोवा मुक्तीनंतर बरोबर दोन वर्षे आणि एक दिवसाने सत्तारूढ झाले. भाऊसाहेब बांदोडकर आमदार नसतानाही पहिले मुख्यमंत्री बनले.


गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)