कोलवाळ पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद
म्हापसा : बाजारभावापेक्षा कमी किमतीत आयफोन देण्याचे भासवून चिखली कोलवाळ येथील एका व्यक्तीला २२.२४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बळीराम प्रकाश म्हापणकर व राकेश उर्फ अमित दुबे या संशयितांविरुद्ध कोलवाळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडला. या प्रकरणी प्रथमेश नरहरी पिंगुळकर यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
बळीराम म्हापणकर याने आपण अॅपल कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तर, संशयित राकेश दुबे याने आपण अॅपल फोन्सचा व्यवहार करणाऱ्या युनिकॉर्न कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही संशयितांनी समान हेतूने फिर्यादीला बाजारभावापेक्षा कमी किमतीत आयफोन उपलब्ध करून देण्याचा बहाणा केला आणि फिर्यादीला २२ लाख २४ हजार ४७५ रूपये रक्कम देण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर संशयितांनी फिर्यादींना मोबाईल दिले नाहीत किंवा रक्कम परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
संशयितांविरुद्ध पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ३१९(२), ३१८(४) व ३(५) कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. तसेच संशयितांविरुद्ध नोटीस जारी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत खरत करीत आहेत.