पणजी : गुजरात येथील रितेश पटेल याचा मृतदेह मांडवी नदीत २९ ऑक्टोबर रोजी सापडला होता. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी अहमदाबाद - गुजरात येथील नाझनीन अख्तर सय्यद (२७) आणि झोयाझबीन सय्यद (२०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी यश पटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्याचा भाऊ रितेश पटेल हा नाझनीन अख्तर सय्यद आणि झोयाझबीन सय्यद या दोघा महिलांबरोबर गोव्यात आला होता. त्यानंतर तिघांनी रायबंदर येथील एका हाॅटेलात वास्तव्य केले होते. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वा. त्या तिघांमध्ये काही क्षुल्लक कारणामुळे वाद झाला. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. या संदर्भात त्या महिलांनी जुने गोवा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी सकाळी रितेश पटेलचा मांडवी नदीत कांपाल परिसरात मृतदेह सापडला. या प्रकरणी यश पटेल यांनी तक्रारीत दोघा महिलांनी रितेशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा दावा केला. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहीन शेट्ये यांनी नाझनीन अख्तर सय्यद आणि झोयाझबीन सय्यद या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.