आयपीएल २०२५ : २ कोटी रुपयांपासून लागणार बोली
मुंबई : आयपीएल २०२५ चा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे होणार आहे. हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दा येथे खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. यावेळचा लिलाव खूपच रंजक असणार आहे, कारण यात जागतिक क्रिकेटचे अनेक मेगा स्टार भाग घेत आहेत.
ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, मिचेल स्टार्क, फाफ डू प्लेसिस, इशान किशन, जोस बटलर, सॅम कुरन, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा, ब्रूक, जोफ्रा आर्चर, डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डी कॉक या स्टार क्रिकेटर्सचा समावेश यामध्ये असेल.
लिलावात सर्वाधिक खेळाडू भारतातील
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स लिलावाचा भाग असणार नाही. स्टोक्सने आयपीएल २०२५ च्या लिलावात नोंदणी केलेली नाही. आयपीएलच्या नवीन नियमांनुसार बेन स्टोक्स पुढील हंगामातही सहभागी होऊ शकणार नाही. मेगा लिलावासाठी ज्या १,५७४ खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत, त्यापैकी १,१६५ खेळाडू भारतातील आहेत. या लिलावासाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ५० हून अधिक खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत. यावेळचा लिलावदेखील खास असेल कारण यात अमेरिका, यूएई, कॅनडा आणि अगदी इटलीचे खेळाडूही दिसणार आहेत.
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदणी केली?
आयपीएल २०२५च्या लिलावासाठी अफगाणिस्तानचे २९ खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे ७६ खेळाडू, बांगलादेशचे १३ खेळाडू, कॅनडाचे ४ खेळाडू, इंग्लंडचे ५२ खेळाडू, आयर्लंडचे ९ खेळाडू, इटलीचा १ खेळाडू, नेदरलँडचे १२, न्यूझीलंडचे ३९ खेळाडू. स्कॉटलंडचे २ खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे ९१ खेळाडू, श्रीलंकेचे २९ खेळाडू, यूएईचा १ खेळाडू, यूएसएचे १०, वेस्ट इंडिजचे ३३ आणि झिम्बाब्वेचे ८ खेळाडू आहेत.
आता संघ शॉर्टलिस्ट केले जातील
जरी १५७४ खेळाडूंनी आयपीएलसाठी नोंदणी केली असली तरी या सर्वांचा लिलाव पूलमध्ये समावेश होणार नाही. आता सर्व संघ शॉर्टलिस्ट करून या खेळाडूंमधून खेळाडूंची निवड करतील. त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंनाच लिलावात सामावून घेतले जाईल आणि त्या खेळाडूंवरच बोली लावली जाईल. या लिलावात एकूण २०४ खेळाडू विकले जाणार आहेत.
दिग्गज खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी
खलील अहमद, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्ण, टी नटराजन, देवदत्त पडिक्कल, कृणाल पंड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यासह दोन कोटींच्या मूळ किमतीत मिचेल स्टार्कचाही समावेश आहे. भारताच्या सरफराज खान आणि पृथ्वी शॉ यांनी त्यांची मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली आहे. इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसनही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये दिसणार आहे. अँडरसनची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये आहे.