फसवणुकीची तक्रार नोंद झाल्यापासून प्रिया फरार होती. काल डिचोली पोलिसांनी कोल्हापुरातून तिला ताब्यात घेतले होते. नंतर गोव्यात आणून रीतसर अटक करण्यात आली.
डिचोली: गेल्या काही दिवसांत गोव्यात सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशाच एका प्रकरणाचा छडा डिचोली पोलिसांनी लावला व कोल्हापूर येथून पूजा उर्फ प्रिया यादव या महिलेस ताब्यात घेत रीतसर अटक केली. पोलिसांनी प्रियाला डिचोलीच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता तिला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान डिचोली पोलिसांनी पूजा यादव व तिचा साथीदार रोहन वेंझी यांच्याकडून लाखांचे ११६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. संशयितांनी पीडितांकडून २०.७० लाख रुपये घेतल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.
डिचोली पोलीस स्थानकात २२ ऑगस्ट रोजी लक्ष्मी अशोक दलवाई (साईनाथ अपार्टमेंट, डिचोली-मूळ बेळगाव) यांनी फसवणुकीबाबत फिर्याद नोंदवली होती. पूजा यादवने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून २० लाख ७० हजार रुपये उकळल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत पूजा यादव हिने ११६ ग्राम सोने तारण ठेवून गोल्डलोन घेतल्याचे उघड झाले. या सोन्याची किमत सध्याच्या बाजार भावानुसार ९ लाख रुपये आहे.
पूजा यादवने डिचोली तसेच इतर ठिकाणच्या लोकांनाही सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून १ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे तिच्या नावे एकही बँकेचे खाते नाही, तसेच ती चालवत असलेल्या तिन्ही गाड्यांची तिच्या नावावर नोंदणी नाही. तक्रार नोंद झाल्यापासून पूजा फरार होती. तर पोलीस कर्मचाऱ्याचाही या प्रकरणी समावेश असल्याचे समोर आल्यावर रोहन वेंझी यास सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान डिचोली पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक महाराष्ट्रात पाठवले होते. तंत्रज्ञानाचा अवलंब करत तिचा शोध घेण्यात आला. दरम्यान पूजा यादव फुलेवाडी-कोल्हापूर येथे असल्याचे आढळले. येथे ती दोन महिन्यांपासून लपून बसली होती. येथे जात सापळा रचून तिला ताब्यात घेतले व डिचोलीत आणत तिला रीतसर अटक करण्यात आली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्त्वाखाली डिचोली पोलिसांनी कारवाई केली. पुढील तपास सुरु आहे.