भारताने केला या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध
ब्रॅम्प्टन : रविवारी एका मंदिरात आलेल्या भाविकांवर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. त्यांनी मंदिरात उपस्थित लोकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मंदिर आणि आसपासच्या भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पील रिजनल पोलीस प्रमुख निशान दुराईप्पा यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेवर ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनीही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. टोरंटोजवळील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरात भारतविरोधी घटकांनी 'जाणूनबुजून' हिंसाचार केला, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत चिंतित आहोत, असे भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले. दरम्यान यापकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत ग्रेटर टोरंटो एरिया, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडात इतरत्र एकूण ७ मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.
भारत आणि कॅनडातील संबंध मागील एका वर्षांपासून बिघडले आहेत. जून २०२० मध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर याची सुरुवात झाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीएम ट्रुडो यांनी संसदेत निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्सीचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर ट्रूडो यांनी गेल्या महिन्यात निज्जर हत्याकांडात भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.
यानंतर भारताने संजय वर्मा यांच्यासह सहा राजनयिकांना परत बोलावले. ट्रूडो यांचे भारताशी वैर दीर्घकाळापासून सुरू आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात उघडपणे अतिरेकी संघटनांशी संबंधित असलेल्या लोकांचा समावेश आहे असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या महिन्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले होते