दिवाळीने चैतन्याचे वातावरण, तर पूजाचे कारनामे उघड होणे सुरूच
दिवाळीनिमित्त या आठवड्यात सर्वत्र आनंदी वातावरण पहायला मिळाले. पावसाने थोडी उघडीप घेतल्याने नागरिक, व्यापारी सुखावले होते. लक्ष्मी पूजनाने यात अधिकच भर पडली. सुखदायक वातावरण असतानाच या आठवड्यात किरकोळ अपघात घडले. भुतानी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले उपोषण प्रेमानंद नाईक यांनी दहा दिवसानंतर सोडले. ठकसेन पूजा नाईकचे अनेक कारनामेही यावेळी उघडकीस आले. या आठवड्यातील घटनांचा घेतलेला हा आढावा.
रविवार
ठकसेन पूजाचा खेळ बारा वर्षांपासून होता सुरू!
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेली संशयित पूजा नाईक ही २०१२-१३ मध्ये राज्यातील एका प्रादेशिक पक्षाच्या पणजीतील कार्यालयात कार्यरत होती. तेथील ओळखीचा फायदा घेत तिने त्या काळात दहा जणांना सरकारी नोकरी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
व्हीआरएसला अल्प प्रतिसाद
राज्य सरकारने ‘क’ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या व्हीआरएसला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सुमारे ६० हजारपैकी फक्त ९७ जणांनीच आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केले आहेत. अर्ज येणे सुरूच असून शिक्षण खात्याला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याने योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढू शकते, अशी माहिती आर्थिक विभागातील सूत्रांनी दिली.
उपोषणकर्ते प्रेमानंद नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल
सांकवाळ येथे उपोषणाला बसलेले प्रेमानंद नाईक यांच्या मागण्या न झाल्याने सातव्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरुच होते. दरम्यान, सांकवाळच्या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन प्रेमानंद नाईक हे पंचायत कार्यालयाच्या इमारतीमधील शौचालयामध्ये एग रोल खात असल्याचा आरोप केला. मात्र, व्हिडिओ व बातमी व्हायरल केली होती त्यांनीच नंतर या व्हिडिओबद्दल शंका व्यक्त केली. मात्र, हे प्रकरण बरेच तापले. यानंतर या तिघांवरच आरोप करण्यात येऊ लागले.
सोमवार
ठकसेन पूजाला दोन सरकारी अधिकाऱ्यांची साथ
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडवणाऱ्या पूजा नाईकने दोन सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरले होते. तिच्या फोन कॉल्समध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचे क्रमांक मिळाले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
नोकरी घोटाळ्यात मुख्याध्यापिकेला अटक
माशेल भागातील एका हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपये उकळल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित सागर नाईक याची मामी सुनीता पाऊसकर (माशेल) हिलाही फोंडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुनीता पाऊसकर एका हायस्कूलच्या मुख्याध्यापिका असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत गावस बेपत्ता असून, पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.
कळंगुटमध्ये ३ हजार निष्कृष्ट दर्जाच्या काजूबिया जप्त
बागा-कळंगुट येथे अन्न व औषधे प्रशासनाने एका काजू बिया पुरवठा गोदामावर छापा टाकला व विक्रीस आणलेल्या निष्कृष्ट दर्जाच्या ३ हजार किलो काजू बिया जप्त केल्या. जप्त केलेल्या या मालाची किंमत सुमारे साडेतील लाख रुपये असून गोदाम मालक अविनाश पोवार (रा. आजरा-महाराष्ट्र) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवार
आवाज वाढल्यास कारवाईचे निर्देश
नरकासुर प्रतिमा उभारणाऱ्या मंडळांनी संगीताचा आवाज रात्रीच्या वेळी ४५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवल्यास ध्वनिप्रदूषण कायद्याखाली कारवाई करावी, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांना दिले आहेत. आवाजाचा त्रास होऊ लागल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही मंडळाने केले आहे.
मुलानेच चोरले घरातील ४ लाख
खोर्ली म्हापसा येथे घरातील कपाटात आईने ठेवलेले ४ लाख रुपये चोरल्या प्रकरणी संशयित प्रीयेश पुंडलिक वायंगणकर (३९) या मुलाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी प्रिया वायंगणकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. ही चोरीची घटना शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.४५ ते १२.३० या वेळेत झाली होती. फिर्यादी प्रिया वायंगणकर यांनी आपल्या कष्टाची ४ लाख रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटामध्ये ठेवली होती. ही रक्कम वरील काळात संशयित प्रीयेश वायंगणकर या त्यांच्या मुलानेच आईच्या नकळत चोरली. कपाटात रक्कम नसल्याचे पाहून प्रिया यांनी मुलाकडे विचारपूस केल्यावय त्याने याला नकार दिला. त्यानंतर प्रिया यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
रसायनाने पिकवलेली ९ क्विंटल केळी जप्त
म्हापसा मार्केट सबयार्डमध्ये अन्न व औषधे प्रशासनाने छापा टाकून इथापोन या रसायनाद्वारे केळी पिकवणाऱ्या दुकानदाराला रंगेहात पकडले. असिफुल्ला हजरत अली करगुटली याच्या दुकानातील ९ क्विंटल केळी प्रशासनाने जप्त केली.
बुधवार
नोकरभरती कर्मचारी भरती आयोगामार्फत होणार
सरकारी नोकरीची पदे यापुढे कर्मचारी भरती आयोगामार्फतच भरली जातील. पुढील काही दिवसांत त्यासंदर्भातील जाहिरातीही प्रसिद्ध होतील. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.
जादा व्याजाचे आमिष दाखवून २.३७ कोटींचा गंडा
राज्यातील सुमारे १६० गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून २.३७ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी यांच्यासह २२ एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमानंद नाईक यांनी सोडले उपोषण
भुतानी प्रकल्पाविरोधात सांकवाळ येथे गेले दहा दिवस उपोषण करणारे माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन नाईक यांनी फादर केनेथ तेलीस यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले. मात्र, भुतानी प्रकल्पाला विरोध कायम राहावा यासाठी दिवाळी काळात तेथे ख्रिश्र्चन बांधवांनी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला.
नरकासुर पाहण्यास गर्दी
दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी झालेली दिसत होती. काही ठिकाणी नरकासुर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आकर्षक बक्षिसेही मंडळांच्यावतीने ठेवण्यात आली होती.
गुरुवार
गाडी आगीत जळून खाक
कांदोळी येथील गणपती मंदिरजवळ पर्यटक टॅक्सी गाडी आगीत जळून खाक झाली. ही आग विझवण्याचे काम करणाऱ्या एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मोबाईल यावेळी चोरीस गेला.
विनायक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
कुडचडे येथील रुपा पारकर खुनाचा छडा लावणारे पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांना चांगल्या तपास कार्यासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर करण्यात आले.
शुक्रवार
चोडणकरांची याचिका सभापतींनी फेटाळली
गत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेल्या आठ आमदारांविरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी शुक्रवारी फेटाळून लावली. त्यामुळे फुटीर आठही आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘गृहनिर्माण’च्या नियमात बदलांचा प्रस्ताव
राज्य गृहनिर्माण मंडळाच्या नियमात विविध प्रकारचे बदल करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. यानुसार नवीन मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत सूचना आणि आक्षेपांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मसुद्यात मंजूर झालेल्या भूखंडावर निवासी बांधकाम करण्याची मुदत १० वर्षांवरुन १२ वर्षे वाढवण्यात आली आहे. तर मुदतीपेक्षा ३ ते ८ वर्षांपर्यंत लांबलेल्या बांधकामांच्या दंडाची रक्कम देखील कमी करण्यात आली.
महसूल वाढीसाठी जमिनींच्या दरांत बदल
व्यावसायिक उद्देशाने विक्री होत असलेल्या जमिनींतून अधिकाधिक महसूल प्राप्त करण्यासाठी राज्य सरकारने तिसवाडी, सासष्टी आणि मुरगाव या तीन तालुक्यांतील जमिनींचे दर वाढवले आहेत. तर, या तालुक्यांतील काही क्षेत्रांतील ५०० चौरस मीटरपर्यंतच्या जमिनींच्या मूळ दरांत ३० टक्क्यांची कपातही करण्यात आली आहे. या दरांची यादी महसूल खात्याकडून जारी करण्यात आली आहे.
शनिवार
नागवा-बार्देश येथे अपघात
नागवा-बार्देश येथे रस्त्यावर ठेवलेल्या वीज केबल रीलला कारची धडक बसली. या धडकेने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पूजा नाईक प्रकरणातील सतरकरची आत्महत्या
फोंडा, केरीतील सरकारी कर्मचारी श्रीधर सतरकर याने कुंकळ्ये-म्हार्दोळ परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सतरकर हा सरकारी नोकरीची आमिषे दाखवून लुबाडणाऱ्या पूजा नाईकच्या प्रकरणातील एक संशयित होता. चौकशीनंतर तो बेपत्ता होता.
साखळी उपोषण तूर्त मागे
कुळेतील दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. वाढवलेले शुल्क २०० रुपयांनी कमी करून ‘जीटीडीसी’च्या काऊंटरसह ऑनलाईन बुकिंगही सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला. यानंतर जीप मालकांचे साखळी उपोषण तूर्त मागे घेतले.