कॅनडाच्या उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

गृहमंत्री शहांवर केलेल्या आरोपांवर आक्षेप : भारत सरकारकडून तीव्र निषेध

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd November 2024, 11:24 pm
कॅनडाच्या उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

नवी दिल्ली : कॅनडाच्या मंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताने कॅनडाच्या उच्‍चायुक्‍तांना समन्स बजावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ‍शुक्रवारी आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावून घेतले आणि कॅनडा सरकारमधील मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांबद्दल समितीसमोर केलेल्या बेताल आणि निराधार आरोपांचा भारत सरकारने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
खलिस्तानवाद्यांचा कळवळा असलेल्या कॅनडाने थेट भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केला होता. भारताने कट रचून कॅनडातील खलिस्तानी नेत्यांना लक्ष्य केल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच यामध्ये अमित शहा यांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोपही कॅनडाकडून करण्यात आला होता. कॅनडाच्या या आरोपांवर भारताने तीव्र संताप व्यक्त करत, हा सर्व प्रकार मूर्खपणाचा आणि निराधार असल्याचे ‍म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावून भारताने या आरोपांवर थेट आक्षेप नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हे आरोप इतके हास्यास्पद आहेत की त्यावर बोलायलाही नको वाटते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्‍पष्‍ट केले की, हे आधीच स्पष्ट झाले आहे की, भारताची बदनामी करण्याच्या आणि इतर देशांवर प्रभाव टाकण्याच्या जाणीवपूर्वक रणनीतीचा भाग म्हणून कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून बिनबुडाचे आरोप आंतरराष्ट्रीय मीडियावर लीक केले आहेत. अशा बेजबाबदार कृतींचे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्‍यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून भारताविरोधात चिखलफेक
विशेष म्हणजे कॅनडाने या आरोपांबाबतची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांना ‘लीक’ करून भारताविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नथाली ड्रोइन आणि उप-परराष्ट्र मंत्री मॉरिसन यांनी वॉशिंग्टन पोस्टला माहिती पुरवत अमित शहांचे नाव यामध्ये गोवले, मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना आरोप केलेच कसे, असा सवाल आता भारताकडून विचारण्यात आला आहे.            

हेही वाचा