गोवा : इफ्फीसाठी २६ दिवसांत ३,२३५ जणांची नोंदणी

संस्थेतर्फे विविध कामांसाठी निविदा जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2024, 11:30 pm
गोवा : इफ्फीसाठी २६ दिवसांत ३,२३५ जणांची नोंदणी

पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी इफ्फी प्रतिनिधी नोंदणी ४ ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती. ३० ऑक्टोबर अखेरीस ३,२३५ जणांची नोंदणी पूर्ण झाली आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
दरवर्षी इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी साधारपणे ८ ते १३ सप्टेंबर दरम्यान सुरू होते. मात्र, यंदा याला उशीर झाला होता. असे असले तरी यावर्षी इफ्फीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत झालेल्या ३,२३५ नोंदणीपैकी १,८७० चित्रपट रसिक, ६३५ विद्यार्थी, तर ७३० चित्रपट क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक आहेत. तर २०९ माध्यम प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.
इफ्फीतील गोवा विभागाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोव्यातील दिग्दर्शक, निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ईएसजीतर्फे हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात कोकणी किंवा मराठी भाषेतील फिचर चित्रपट तसेच कोकणी, मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील बिगर फिचर चित्रपट निवडण्यात येतील. याशिवाय ईएसजीतर्फे इफ्फीची तयारी जोरात सुरू आहे. संस्थेतर्फे विविध कामांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा