साहित्य : दीड कप भाजणीचे पीठ, अर्धा कप पोहे किंवा शिळा भात, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, एक चमचा लाल तिखट, एक मोठा चमचा धणे पूड, पाऊण चमचा जिरं, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, एक चमचा लसूण व मिरचीचा ठेचा, पांढरे तीळ.
कृती : प्रथम एका परातीत भाजणीचे पीठ घ्या त्यात पोहे (भिजवून) किंवा शिळा भात जरा हलक्या हाताने बारीक करून घाला. (पोहे किंवा शिळा भात नाही घातले तरी चालेल.) यात हळद, ओवा, लाल तिखट, धणे पूड, जिरं, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, लसूण आणि मिरचीचा ठेचा ( ठेचा घातल्याने खूप छान चव येते.) तिखट नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. हे सर्व एकत्र करा. पोहे घातले असाल तर पोह्यांमध्ये पाणी असल्यामुळे पाणी थोडं थोडं घाला. जास्त घट्ट मळू नका. मऊसर छान मळून झालं की त्यात कोथिंबीर टाका आणि पुन्हा मळून घ्या. जर हवे असेल तर हवी ती भाजी ही त्यात घालू शकता.
एक ओला कपडा घेऊन त्यावर पिठाचा एक लहान गोळा घ्या त्यावर पांढरे तीळ टाकून हाताला पाणी लावून ते थापा. तिळामुळे थालीपीठ खूप सुंदर दिसू लागतं. थालीपीठ थापताना हाताच्या मध्यभागाने थापावे म्हणजे त्यावर बोटे उमटणार नाहीत. एका तव्यावर थोडं तेल टाका आणि त्यावर हे थालीपीठ घाला. एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आला की दुसऱ्या बाजूने परता व छान खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे खमंग खुसखुशीत असे भाजणीचे थालीपीठ तयार आहे.
संचिता केळकर