पुण्यात टीम इंडियाचे न्यूझीलंडकडून ‘पानिपत’

१२ वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका : सँटनर ठरला कर्दनकाळ

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th October 2024, 11:07 pm
पुण्यात टीम इंडियाचे न्यूझीलंडकडून ‘पानिपत’

पुणे : पुण्यात टीम इंडियाचे पानिपत करत न्यूझीलंडने सलग दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेवर २-० असा कब्जा केला. या पराभवसह भारतीय संघाला १२ वर्षानंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली आहे. याआधी भारताने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती.
पुण्यातील सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २४५ धावांतच न्यूझीलंडच्या फिरकीसमोर गुडघे टेकले. ज्यामुळे किवी संघाने ११३ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मिचेल सँटनरसमोर सपशेल शरणागती पत्करली. या विजयासह न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली आहे.
२००० नंतर भारतात कसोटी मालिका जिंकणारा न्यूझीलंड हा चौथा संघ आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने ही कामगिरी केली होती. यासह टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १८ मालिका विजयांची मालिका खंडीत झाली. न्यूझीलंडसाठी मिचेल सँटनरने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने ४२ धावांची खेळी केली.
भारतीय फलंदाजांनी मिचेल सँटनरसमोर टेकले गुडघेन्यूझीलंडने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली होती, अशा स्थितीत टीम इंडियाला किवी संघाला छोट्या धावसंख्येपर्यंत रोखणे आवश्यक होते. पण इथे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम भारताच्या मार्गात अडथळा ठरला, ज्याने ८६ धावांची खेळी करत टीम इंडियाला विजयापासून दूर नेले. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनीही अनुक्रमे ४१ आणि ४८ धावांचे योगदान दिले, पण टॉम लॅथमची अर्धशतकी खेळी भारतासाठी सर्वाधिक नुकसानदायक ठरली.
जैस्वाल आणि जडेजा या दोघांशिवाय अन्य कोणताही फलंदाज २५ हून अधिक धावा करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा आठ धावा करून बाद झाला, शुबमन गिल २३ धावा करून बाद झाला, विराट कोहली १७ धावा करून बाद झाला, ऋषभ पंतला खातेही उघडता बाद झाला, सर्फराझ खान नऊ धावा करून बाद झाला आणि रविचंद्रन अश्विन १८ धावा करुन बाद झाला. आकाश दीप एक धाव करू शकला आणि जसप्रीत बुमराह १० धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
फलंदाजीतील अपयश हेही भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. पुणे कसोटीच्या दोन्ही डावांत रोहित शर्माला दुहेरी आकडाही गाठता आला नाही, तर विराटने दोन्ही डावांत मिळून केवळ १८ धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील ऋषभ पंतने पहिल्या डावात १८ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. बेंगळुरू कसोटी शतकवीर सर्फराझ खान यावेळी कोणतीही जादू दाखवू शकला नाही. एकूणच, फलंदाजीतील अपयश हे टीम इंडियाच्या मालिका पराभवाचे प्रमुख कारण बनले आहे.
जैस्वालचा विक्रम
यशस्वी जैस्वालने नवा इतिहास रचला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात ३० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम करणारा जैस्वाल हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. २०२४ मध्ये जैस्वालने कसोटीत ३० षटकार मारले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये, जैस्वाल कसोटीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. या बाबतीत न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम पहिल्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने २०१४ मध्ये एका कॅलेंडर वर्षात ३३ षटकार लगावले होते. या बाबतीत बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे, स्टोक्सने एका कॅलेंडर वर्षात २६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. २०२२ मध्ये स्टोक्सने कसोटीत २६ षटकार लगावले होते.
जैस्वालने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
यासह भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. यशस्वीने भारतीय भूमीवर कसोटीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालने भारतीय भूमीवर सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा आकडा गाठण्यासाठी २२ वर्षीय यशस्वीने केवळ १३२५ चेंडूंचा सामना केला. तर वीरेंद्र सेहवागने भारतीय भूमीवर १४३६ चेंडूंचा सामना करत आपल्या १००० धावा पूर्ण केल्या होत्या. अशाप्रकारे यशस्वी जैस्वाल आता या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
एवढेच नाही तर यशस्वी जैस्वाल या वर्षी १००० धावा पूर्ण करणारा एकमेव भारतीय ठरला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात १००० धावा करणारा यशस्वी जो रूटनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
३३ – ब्रेंडन मॅक्युलम (२०१४)
३२ – यशस्वी जैस्वाल (२०२४)*
२६ – बेन स्टोक्स (२०२२)
२२ – ॲडम गिलख्रिस्ट (२००५)
२२ – वीरेंद्र सेहवाग (२००८)
भारताचे अव्वल स्थान धोक्यात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत १२ सामन्यांनंतर ६८.०६ टक्के गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, बंगळुरूनंतर आता पुण्यातील निराशाजनक पराभवानंतर अंतिम फेरीचा मार्ग थोडा आव्हानात्मक बनला आहे. भारतीय संघाला या पराभवानंतर टक्केवारीत फटका बसला आहे. भारताची टक्केवारी आता ६२.८२ वर घसरली आहे. जे ऑस्ट्रेलियाच्या टक्केवारीच्या फारच जवळ आहे. जर भारताने आपली कामगिरी सुधारली नाहीतर त्यांना गुणतालिकेतील पहिले स्थान गमवावे लागेल.