पणजी : कुंकळळी औद्योगिक वसाहती मधील प्रदूषण करणारे उद्योग केवळ पाच दिवसात पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे कुंकळी गावात पुन्हा एकदा दुर्गंधी पसरली आहे. हे उद्योग कायमस्वरूपी बंद केले नाहीत तर उच्च न्यायालयात किंवा एनजीटीमध्ये जाण्याचा इशारा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी दिला. सोमवारी पर्वरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार एल्टन डिकोस्टा व कुंकळळीतील स्थानिक उपस्थित होते.
आलेमाव म्हणाले की, सध्या सुरू झालेल्या उद्योगांनी पुन्हा एकदा प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडणे, ईटीपी प्लांटचा वापर न करणे असे प्रकार सुरू केले आहेत. येथे प्रत्येक उद्योगासाठी स्वतंत्र ईटीपी असणे आवश्यक आहे. मात्र बहुतेक ईटीपी कार्यान्वित नाहीत. आम्ही दरवेळी तक्रार केल्यावर उद्योग बंद केले जातात मात्र काही दिवसात ते पुन्हा सुरू होतात. यावेळी केवळ ७ हजार रुपयांचा दंड करून हे घातक उद्योग पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यासाठी डॉलर, पौंड, युरो मध्ये व्यवहार झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे.
ते म्हणाले, येथील कामगारांना दयनिय अवस्थेत काम करण्यास भाग पाडले जात आहे. एका युनिटमध्ये ४०० ते ५०० कामगार काम करत आहेत. एका लहान खोलीत १२ ते १५ कामगार राहत आहेत. येथील घाण वास , प्रदूषणात काम करण्यासाठी कामगारांना ड्रग्ज घ्यावे लागत आहे. येथे ड्रग्जचा पुरवठा होत आहे का याची चौकशी सरकारने करावी. येथील प्रदूषणामुळे झालेल्या वाईट परिणामांची समीक्षा केली पाहिजे. येथील प्रदूषण थांबले नाही तर आम्ही एनजीटी किंवा उच्च न्यायालयात जाणार आहोत.